स्वाभिमानीतून हकालपट्टीनंतर सदाभाऊ खोत यांची घोषणा
मुंबई : आंदोलन न करता संवाद केल्याने अनेक प्रश्न सुटतात. मात्र खासदार राजू शेट्टी यांनी प्रश्न सुटणे महत्वाचे नव्हते. माझ्यावर नाहक ठपका ठेवून स्वाभिमानीतून बाहेर काढल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून नवी संघटना उभारत असून, 21 तारखेला त्यांची घटस्थापना करणार असल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांनी सांगितले. नवी संघटना स्थापन करण्यासाठी 16 सदस्यीय मसुदा समिती गठीत केली असून, शेतकर्यांसाठी संघर्ष आणि संवाद ही संघटनेची भूमिका असल्याचे खोत यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
मसुदा समिती ठरविणार घोषणा
नव्या संघटनेचे नाव घटस्थापनेला जाहीर होणार असल्याचे सांगत मसुदा समिती 21 रोजी कोल्हापुरात अहवाल ठेवणार असल्याचे खोत यांनी सांगितले. ही समिती शेतकर्यांसाठी कृती कार्यक्रम तयार करेल तसेच संघटनेचे नाव, संघटनेचा झेंडा शेतकर्यांचा असेल असे खोत म्हणाले. 30 सप्टेंबरला दसर्याला इचलकरंजीत महाराष्ट्रातील शेतकर्याला सोने लुटण्यासाठी एकत्रित बोलावले जाणारे असल्याचे सांगत हीच आमची ऊस परिषद असेल, असे ते म्हणाले. संघटना शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि युवक यांच्या आघाड्या बनवून काम करणार असल्याचे ते म्हणाले.
शेट्टींवर आरोप तर सत्ताधार्यांची वाहवाह
मी शरद जोशींच्या चळवळीतील कार्यकर्ता आहे असे सांगत खोत यांनी खासदार शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली. शेट्टी यांनी काढलेली आत्मक्लेश यात्रा नव्हती, सदाभाऊ क्लेश यात्रा होती असे ते म्हणाले. काम करत असताना विरोधकांचा हल्ले झेलणे आणि अंतर्गत घरभेद्यांचा सामना करावा लागला. माझ्यावर चौकशी समिती नेमली. समितीच्या सदस्यांचे चळवळीतील योगदान माझ्यापेक्षा कमी असल्याचे सांगत जाणीवपूर्वक अपमानित करण्याचा प्रयत्न केला असे खोत म्हणाले. मात्र या परिस्थितीत कार्यकर्ते माझ्या पाठीशी राहिल्याने मी डगमगलो आहे. मुख्यमंत्र्यांसह चंद्रकांत पाटील, रावसाहेब पाटील दानवे यांनी मोलाची साथ दिल्याचे सांगत सरकार चांगले असून, संवाद ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पूर्वीचे सरकार संवादाऐवजी लाठ्या मारणारे होते असे म्हणत शेतकर्यांसाठी वेळ पडली तर या सरकारविरोधातही संघर्ष करू, असे ते म्हणाले.
बाहेर पडण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव
सरकरमधून बाहेर पडण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव आणला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. बाहेर पडण्यासाठी शेतीमालाला भाव, स्वामिनाथन आयोग हे कारण पुढे केले मग यासाठी तुम्ही दिल्लीत का आंदोलन केले नाही? असा सवाल त्यांनी शेट्टी यांनी केला. माझ्यावर भाजपचा हस्तक असल्याचा आरोप केला मग युती तुम्हीच केली. असे असेल तर मला राजीनामा द्यायला लावता तुम्ही आधी राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले. स्वाभिमानी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अॅड. सतीश बहुलकर, गजानन अहमदाबादकर, पांडुरंग शिंदे, दीपक भोसले, सुरेश पाटील यावेळी उपस्थित होते.