21 लाखांच्या चांदीच्या बिस्कीटांवर चोरट्यांचा डल्ला

मुक्ताईनगर : उभ्या असलेल्या लक्झरीतून चोरट्यांनी 30 किलो वजनाच्या व 21 लाख रुपये किंमतीच्या चांदीच्या बिस्कीटांवर डल्ला मारल्याची घटना तालुक्यातील घोडसगाव फाट्याजवळ घडल्याने खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे.

नजर चुकताच लांबवली बॅग
सराफा व्यावसायीक मनोज देवासी यांनी आपल्याकडील कर्मचारी
गोपाराम देवासी (24, राजस्थान, ह.मु. हिंगोली) यांना तीस किलो चांदीची बिस्किटे इंदूर येथे पोहोचवण्यास सांगितले होते. 21 लाखांची चांदीची बिस्कीटे घेवून देवासी हे हिंगोलीहून रेल्वेने अकोल्यात 16 रोजी आले व तेथून ते लक्झरीने इंदौरकडे निघाले असताना बुधवार, 16 रात्री रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरजवळील घोडसगाव फाट्यावर लक्झरी थांबल्यानंतर देवासी हे जेवणाचे पार्सल घेण्यासाठी खाली उतरले व त्याचवेळी पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी चांदीचे बिस्कीटे ठेवलेली बॅग लांबवली. बॅग चोरीस लक्षात आल्यानंतर त्यांनी मालकाशी संपर्क केला. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एक पथक अकोल्याकडे रवाना झाले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश सोळंके करीत आहेत.