210 वीज चोरट्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा

0

नवापूर (हेमंत पाटील) । बील कमी यावे म्हणून अनेक वीज ग्राहक वीज मीटरमध्ये फेरफार करीत असल्याचे प्रकार वाढल्यामुळे अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर धडक कारवाई करीत वीज वितरण कंपनीने 210 ग्राहकांवर कारवाई केली आहे. अनेक उच्चभू्र वस्तीत वीज चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. वीज चोरी कुठे होत आहे हे शोधण्यासाठी वीज चोरी शोध खबरे फिरत असल्याचे वृत्त आहे.

चोरीचे प्रकार वाढले
नवापूर शहरात अनेक वीज ग्राहक वीज मीटर मध्ये फेरफार करुन वीज कंपनीला फसवत आहेत. संगनमत करुन चीरमीरी देऊन वीज चोरी अनेक वर्षा पासुन करत असल्याचे बोलले जात आहे. नंदुरबार जिल्हात वीज चोरीचे प्रमाण मोठे असून आकडे टाकून वीज चोरीचे प्रकार सर्रास सुरू आहे. वीज चोरी वाढत असल्याचे कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे गेल्या महिन्या पासुन महावितरण कंपनीने अचानक धाडसत्र सुरु करुन वीज चोरी करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.

कल्याणचे पथक धडकले
वीज चोरी होत असलेल्या ठिकाणीचे फोटो काढायचे त्या नंतर अचानक छापा टाकुन कारवाई करायची तसेच वीज चोरी कुठे होते हे शोधण्यासाठी वीज चोरी शोध खबरे फिरत आहेत. वीज कंपनीच्या स्थानिक अधिकार्‍यांना थांगपत्ता लागू न देता कल्याणच्या पथकाने धडक कारवाई केल्याने यात ’दाल मे यहाँ कुछ काला हे’ असे बोलले जात आहे कल्याणच्या पथकात सात अधिकारी कर्मचारी होते. वीज चोरी करण्यासाठी अनेक नवनवीन फंडे वापरण्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यात मीटरमध्ये छेडछाड करण्याबरोबरच मीटरचा वेग कमी करण्यासाठी एक्स-रे फिल्मचा वापर करणे, मीटर वर चुंबक ठेवणे, सरळ आकडे टाकणे, मीटर काटा अडकवणे आदी प्रकारचा समावेश आहे. सिंगल व थ्री पेज वीज पुरवठा असलेल्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांची तपासणी झाली. नंदुरबार वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील व उपविभागीय कार्यकारी अभियंता पंजाबराव बोरसे यांचा मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली आहे. चोरट्यांना दंड ठोठावण्यात आला.

कंपनीची कडक पावले
वीज चोरी टाळण्यासाठी काही भागात इन्सुलेटेड केबल टाकण्यात आली आहे. त्याचा कंपनीला फायदा होत असून वीज चोरी थोपविण्यासाठी महावितरण कंपनीने कडक पाऊले उचलली आहेत. यापुढे आता शहरातील सर्व वीज ग्राहकांचा मीटरची तपासणी होणार असून वीज थकबाकीवर ही आता लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे महावितरणाचा हा बडगा नक्कीच कंपनीला अच्छे दिन आणणारी ठरो अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.