मुंबई:- राज्य परिवहन महामंडळात काम करणाऱ्या 210 महिला वाहकांचा ड्युटीमुळे गर्भपात झाला असल्याचा अहवाल आल्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशअध्यक्षा चित्रा वाघ यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन देत संताप व्यक्त केला. यानंतर परिवहन खात्यातील महिला वाहकांना गर्भावस्थेच्या काळात कार्यालयीन काम दिले जाणार असल्याचे आश्वासन रावते यांनी दिले असल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली.
वाघ यांनी दिले निवेदन
वाघ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून काम करणाऱ्या 210 महिला कर्मचाऱ्यांचा गर्भपात झाला असल्याचा अहवाल समोर आला आहे. गर्भधारणा झालेल्या महिला वाहकांचा सततचा प्रवास, प्रवासादरम्यान होणारी अव्यवस्था, प्रवाशांकडून होणारी धक्काबुक्की अशा अर्क कारणांमुळे गर्भपातास सामोरे जावे लागते. गरोदरपणाच्या काळात डेस्कला काम देण्याची मागणी महिला वाहकांकडून केली जाऊनही परिवहन खाते असंवेदनशील असल्याची तक्रार वाहकांनी केलेली आहे. यामुळे सरकारचा निषेध करत या महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती पाऊले उचलावी अशी मागणी या निवदेनातून चित्रा वाघ यांनी केली.
विषयाचे गांभीर्य ओळखा
दरम्यान चित्रा वाघ यांनी या विषयावर रावते यांनी भेट घेऊन गांभीर्यता सांगितली. तसेच यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. खूप दिवसांपासूनची मागणी असून महिला वाहकांना न्याय दयावा अशी मागणी देखील केली. यावेळी त्यांनी निषेध देखील व्यक्त केला. यावर रावते यांनी गर्भवती महिला वाहकांना कार्यालयीन ड्युटी दिली जाईल, असे आश्वासन दिले.