जळगाव: शहरातील आकाशवाणी चौकात राष्ट्रीय महामार्गावर सिग्नलवर उभ्या कारने अचानकपणे पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली. कारमधील चौघांना वेळीच प्रकार लक्षात आल्याने चौघेही कारमधून बाहेर उतरुन पळाले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या आगीत संपूर्ण कार खाक झाली आहे. महामार्गाच्या मधोमध घडलेल्या प्रकारामुळे काही वेळासाठी वाहतूक खोळंबली होती.
कासोदा येथील चौघेही मित्र कारने आले होते जळगावात
कासोदा येथील आशिष मिलिंद तायडे वय 22 हा त्याचे मित्र दिपक अडकमोल, पवन अडकमाले, गोपाल राक्षे यांच्यासोबत त्याची कार जी.जे.05 सी.एच.9449 ने बुधवारी सकाळी खाजगी कामासाठी जळगावात आला होता.
अजिंठा चौफुली येथून खाजगी काम आटोपून दुपारी 2 वाजेच्या सुमारास ते पुन्हा कासोदा येथे घराकडे जाण्यासाठी निघाले. अडीच वाजता ते अजिंठा चौफुली येथे पोहचले. यााठिकाणी सिग्नल नसल्याने त्यांनी कार थांबविली. यावेळी कारमधून धुर निघत असल्याचे अशिषसह त्याच्या मित्रांच्या लक्षात आले. नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी चौघेही कारमधून बाहेर उतरले. पाहणी केली असता, कारच्या खाली शॉर्टसर्किटने झाल्याचे दिसून आले. काही कळण्याच्या आत कारमधून भडका उडाला. यानंतर चौघेही मित्र महामार्गालगत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे पळत सुटले.
बघ्यांची गर्दी वाहतुकीचा खोळंबा
याठिकाणी चौघात उभ्या वाहतूक पोलिसांनी प्रकार तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविला. त्यानुसार गोलाणी मार्केट येथून अवघ्या काही मिनिटातच अग्निशमन बंब घटनास्थळावर पोहचला.
अग्निशमन विभागाचे युसूफ पटेल, देवीदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, गंगारधर कोळी, राजेंद्र चौधरी, सोपान जाधव या अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. रस्त्याच्या मधोमध कार जळाल्याने तसेच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने रस्त्यावर काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती. व वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शहर वाहतूक शाखेचे साहेबराव कोळी, किरण मराठे, गणेश पाटील, बारसू नारखेडे, फिरोज तडवी, मोहनीन पठाण या कर्मचार्यांनी जेसीबीच्या सहाय्याने खाक झालेली कार रस्त्याच्या बाजूला केली व वाहतूक सुरळीत केली. अग्निशमन विभागाचे प्रकाश चव्हाण यांनी घटनेची नोंद केली आहे.