राष्ट्रवादी महानगर… ओसाड गावाचे वतनदार

0

जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे काही प्रमाणात अस्तित्व आहे, मात्र जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव शहरात राष्ट्रवादी आहे कुठे? असा प्रश्न उपस्थित केला तर आश्‍चर्य वाटू नये. जळगाव शहरात राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांचे वास्तव्य आहे. यातील ईश्वरलाल जैन आणि गुलाबराव देवकर यांना जळगाव शहरातील कानाकोपर्‍याचा अभ्यास आहे. कारण, ईश्वरलाल जैन यांची राजमल लखीचंद ही सोन्याची पेढी अनेक वर्षांपासून जळगाव शहरात आहे. तर गुलाबराव देवकर हे तत्कालीन नगरपालिकेत (आताची महापालिका) स्थायी समिती सभापती राहिले आहेत. त्यामुळे साहजिकच जळगाव शहरवासियांची नस ही या दोन्ही नेत्यांना चांगलीच माहित आहे. हे सारे असतांनाही जळगाव शहरात पक्ष संघटना ही केवळ कागदावरच दिसत आहे. सन 2009 मध्ये शिवसेना नेते माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे त्यावेळचे महानगराध्यक्ष मनोज दयाराम चौधरी यांना ईश्वरबाबूजींच्या पाठींब्यावर अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले होते. तेव्हा चौधरी यांनी दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवून अनेकांच्या भुवयाच उंचावल्या होत्या. परंतु, त्यानंतर मनोज चौधरी हे पक्षीय राजकारणापासून अलिप्त झाले. त्यामुळे महानगराची धुरा परेश कोल्हे यांच्याकडे आली. परेश कोल्हे हे गटाव्यतिरिक्त राहिल्याने त्यांना काम करण्यासाठी फारसा कालावधी मिळाला नाही. त्यामुळे शहरात युवकांचे संघटन उभे राहिले नाही. त्यानंतर नीलेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. नीलेश पाटील महानगराध्यक्ष असतांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील हे होते. सुरुवातीला शहरातील गाळ्यांचा प्रश्न हाती घेत नीलेश पाटील यांनी आक्रमकपणे आंदोलने केली. मात्र, देवकर समर्थक असल्याचा शिक्का त्यांच्यावर राहिल्याने पक्ष संघटना बांधणीत त्यांनाही युवकांची फौज उभी करण्यात यश आलेच नाही. महापालिका निवडणुकीवेळी नीलेश पाटील यांनी देवकरांनाही चकवा देत अचानकपणे शिवसेनेत प्रवेश केल्याने महानगराचे पद पुन्हा रिक्त झाले. या रिक्त जागी नामदेव चौधरी यांची महानगराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. मात्र नामदेव चौधरी यांचा कार्यकाळ केव्हा संपला? त्यांनी कधी राजीनामा दिला? का त्यांची हकालपट्टी झाली? याविषयी कुठलीही माहिती समोर न येता युवकचे अध्यक्ष राहिलेले अभिषेक पाटील थेट जयंत पाटील यांच्याकडून महानगराध्यक्षचे नियुक्ती पत्रच घेऊन आले. महानगराध्यक्ष झाल्यानंतर अभिषेक पाटील यांनी कार्यकारणी जाहीर केली. मात्र ही कार्यकारणी केवळ कागदावरच दिसून येते.

महापालिका निवडणुकीत अस्तित्वच संपुष्टात
सन 2013 मध्ये महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 नगरसेवक होते. राज्यात 2014 मध्ये भाजपा सरकार स्थापन झाल्यानंतर गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाने वर्चस्व मिळविले. जळगाव महापालिकेवर शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचे एकहाती वर्चस्व राहिले होते. सुरेशदादांचे साम्राज्य खालसा करणे हा एकमेव अजेंडा भाजपाचे सन 2018 च्या महापालिका निवडणुकी राबविला. सुरुवातीला युतीच्या गप्पा झाल्या मात्र ऐनवेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेचेच सदस्य फोडून अर्धी लढाई निवडणुकीआधीच जिंकली. भाजपाचा हा रूबाब बघता राष्ट्रवादीनेही माजी मंत्री गुलाबराव देवकर या अनुभवी नेत्याच्या नेतृत्वाखाली मनपा निवडणूक लढविली. देवकरांनी काँग्रेसच्या साथीने ही निवडणूक लढविली. मात्र महापालिकेच्या या निवडणुकीकडे इतर जिल्हा नेत्यांनी पाठ फिरविल्याने 11 नगरसेवक राहिलेल्या महापालिकेतील राष्ट्रवादीचे अस्तित्वच निवडणूक निकालानंतर संपुष्टात आले. सध्या महापालिकेत राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही हे खेदाने म्हणावे लागेल.

जनतेचे प्रश्न तडीस नेण्यात अपयश
जळगाव महानगराची जबाबदारी अभिषेक पाटील यांच्याकडे आहे. त्यांनी मध्यंतरी शहरातील प्रश्नांना हात घालतांना कचरा घोटाळा, नगरसेवकांचे पाकीट प्रकरण, अतिक्रमणपूरक भूमिका, रस्त्यांवरील खड्डे प्रकरण अशा प्रश्नांवर आंदोलने केली. मात्र ही आंदोलने केवळ फोटोपुरताच मर्यादीत राहिल्याचे दिसून आले. या आंदोलनांमुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला तसूभरही फरक पडला नाही किंवा त्यांनी पाडून घेतला नाही असे म्हटले तरी चालेल. कचरा घोटाळा, नगरसेवकांचे पाकीट प्रकरण याबाबत कुणावरही घरकुलसारखी कारवाई झाली नाही किंवा साधी चौकशी देखील झाली नाही. ठेक्यांमध्ये नगरसेवक पाकीटे घेत असतील तर त्यांची नावे राष्ट्रवादीकडून जाहीर का करण्यात आली नाही? तसेच कचरा घोटाळा जर झाला असेल तर त्याची चौकशी अद्यापपर्यंत का झाली नाही? घोटाळा होत असेल तर ठेका बंद का करण्यात आला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना महापालिकेतील घोटाळ्याच्या तक्रारीची चौकशी होऊ नये हे कोडेच आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करून प्रश्न सुटत नाही. त्यासाठी सभागृहात ताकद असणे गरजेचे असते. राजकारणात आणि सभागृहात डोकी मोजली जातात. जळगाव शहर महापालिकेत राष्ट्रवादीचा एकही सदस्य नसल्याने सध्याची महानगर संघटना म्हणजे ओसाड गावाचे वतनदारच म्हणावे लागेल.