गुन्हेगारांचा डाटा आता एका क्लीकवर
भुसावळ (गणेश वाघ) : गुन्हेगारीमुळे राज्यभर बदनाम असलेल्या भुसावळात शिर्डीचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची बदली झाल्यानंतर गुन्हेगारांच्या उलट गणतीला सुरूवात झाली आहे. तीन महिन्यात गुन्हेगारी थोपवण्याचे आश्वासन देत रूजू झालेल्या वाघचौरे यांनी प्रत्यक्षात त्या पद्धत्तीनेच कामकाजाला सुरूवात केली आहे. शिर्डीत सेवेत असताना वाघचौरे यांनी मागील दहा वर्षांचा गुन्हेगारांचा डाटा संकलीत केला होता शिवाय या डाटामुळे गुन्हेगारांवर कारवाया करणे सोपे तर झालेच शिवाय गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आळादेखील बसला होता. तोच ‘शिर्डी पॅटर्न’ भुसावळातही राबवला जात असल्याचे वाघचौरे म्हणाले. भुसावळ विभागातील चारही पोलिस ठाण्यातील 15 हजार 556 गुन्ह्यांमधील गुन्हेगारांचा डाटा एका क्लीकवर उपलब्ध होणार असल्याने पोलिसांना आता उपद्रवींवर सहज कारवाई करता येणे शक्य आहे.
काय आहे शिर्डी पॅटर्न ?
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत येथे दररोज लाखभर भाविक राज्यभरातून दाखल होत असताना घडणार्या गुन्ह्यांचा आलेखही वाढला होता. फसवणूक, चैन स्नॅचिंग यासह अन्य प्रकारच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलिसही गुन्हेगारांना शोधताना हैराण होते मात्र वाघचौरे यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी दहा वर्षांपूर्वी दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांचा डाटा गोळा केला. प्रत्येक गुन्हेगारावर दाखल असलेले गुन्हे, गुन्ह्यांची पद्धत, वास्तव्याचे ठिकाण यासह अन्य बाबींची माहिती संकलीत झाली त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर रजिस्टर पाहण्याची तसदी टळली शिवाय प्रतिबंधात्मक कारवाया करण्यासह गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता आल्याने आपसुकच गुन्हेगारीला आळा बसला.
गुन्हेगारांचा डाटा आता एका क्लीकवर
भुसावळ विभागात शहर, बाजारपेठ, तालुका व नशिराबाद पोलिस ठाणे येते तर चारही पोलिस ठाण्यात गेल्या वर्षात 15 हजार 556 गुन्हे दाखल आहेत. त्यात चोरी, दरोडा, बलात्कार, आर्म अॅक्टसह सर्वच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. बाजारपेठ हद्दील सात हजार 211, शहर हद्दीतील तीन हजार 409, तालुका हद्दीतील तीन हजार 521 तर नशिराबाद हद्दीतील दोन हजार 415 गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराचा स्वतंत्र डाटा तयार करण्यात आला आहे. संगणकाच्या एका क्लिकवर एखाद्या गुन्हेगाराचे नाव टाकल्यानंतर त्याच्यावर विभागात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा सर्व डाटा समोर येईल त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारावर लक्ष ठेवण्यासह प्रतिबंधात्मक कारवाई करता येणार आहे शिवाय शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हेगार निष्नन्न होतील.
गुन्हेगारीला निश्चित पायबंद लागणार
गुन्हेगारांचा डाटा गोळा करण्यात आल्यामुळे पोलिसांना आता संबंधित गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करताना सोयीचे होणार आहे शिवाय एखाद्या आरोपीविरुद्ध नेमके किती गुन्हे दाखल आहेत त्यासाठी रजिस्टर पाहण्याची गरज भासणार नाही शिवाय वेळही त्यामुळे वाचणार आहे. दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर तडीपारी वा प्रतिबंधात्मक कारवाया आता करता येतील, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले. शिर्डीत राबवण्यात आलेल्या या पॅटर्नमुळे गुन्हेगारीला आळादेखील बसला.