पवारांच्या वाढदिवसाला दिसलेली ‘दिलजमाई’ खरी की खोटी?

0

जळगाव (चेतन साखरे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी कट्टर शत्रुता निभावलेल्या दिग्गज नेत्यांनाही एकत्र येणे भाग पडले. पक्ष कार्यालयात पवारांच्या वाढदिवसानिमीत्त माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी खा. ईश्वरलाल जैन आणि माजी आमदार संतोष चौधरी या तिघांच्या हस्ते केक कापण्यात आला. हा क्षण अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. मात्र ही दिलजमाई खरी की खोटी? असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित होत आहे.

राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रु किंवा मित्र नसतो. कोण केव्हा कुणाच्या गळ्यात हात टाकेल त्याचा काही नेम नाही. एकेकाळी कट्टर शत्रुता निभावलेले राजकारणी एक होतांना अनेकांनी पाहिले आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी खा. ईश्वरलाल जैन आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्यातुन कधीकाळी विस्तवही जात नव्हता. सभा, बैठकांच्या भाषणांमधुन या तिनही नेत्यांनी एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. खडसे हे जैन यांच्याविषयी काय बोलतात?, जैन हे खडसेंविषयी काय बोलतात? खडसे- संतोष चौधरी एकमेकांवर काय आरोप करतात? याविषयांची उत्सुकता नेहमीच जिल्ह्याला लागून रहायची. ही उत्सुकता हे तीनही नेते पुर्ण देखिल करायचे हे अनेकांनी पाहिले आहे.

भुसावळ नगरपालिकेची गाजलेली निवडणूक
भुसावळ नगरपालिकेवर एकेकाळी संतोष चौधरी यांचे वर्चस्व होते. त्यांची सत्ता खालसा करण्यासाठी माजी आमदार सुरेशदादा जैन, एकनाथराव खडसे, शिवसेनेचे गुलाबराव पाटील, काँग्रेसकडून रमेश चौधरी हे चारही जण एकत्र आले होते. या चारही जणांनी भुसावळात संतोष चौधरींविषयी आणि संतोष चौधरींनी या चारही जणांविषयी केलेल्या प्रचारातील आरोप आणि भाषणे आजही ताजी आहेत. कार्टुन्सच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी तेव्हा रंगल्या होत्या. तेव्हापासून एकनाथराव खडसे आणि संतोष चौधरी यांच्यात कट्टर शत्रुता निर्माण झाली.

विधानपरिषद निवडणूकीची किनार
आजच्या दिलजमाईला विधानपरिषद निवडणूकीची देखिल किनार आहे. सन २०१० मध्ये झालेली विधान परिषदेची निवडणूक राज्यभरात गाजली. भाजपाकडून एकनाथराव खडसे यांचे चिरंजीव स्व. निखील खडसे, राष्ट्रवादीकडून अनिल चौधरी आणि शिवसेनेच्या पाठींब्यावर मनीष जैन हे अपक्ष म्हणून रिंगणात होते. या निवडणूकीने जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळीच दिशा दिली. स्व. निखील खडसे पराभूत झाल्यानंतर खडसे यांचे चौधरी आणि जैन हे कट्टर राजकीय शत्रु झाले. ज्या-ज्यावेळी संधी मिळेल त्या-त्या वेळी या तिघांनी एकमेकांवर चांगलीच आगपाखड केली. त्यामुळे खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने खडसे,जैन, चौधरी यांची दिसलेली ‘दिलजमाई’ ही खरी की खोटी? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल.