डॉ.युवराज परदेशी: पश्चिम बंगालमध्ये आगामी वर्षात विधानसभा निवडणुका होत आहेत. पश्चिम बंगालचा गड काही करून सर करायचा या महत्त्वाकांक्षेने भाजपला झपाटले आहे. विधानसभा निवडणुकीची औपचारिक घोषणा होण्याआधीच भाजपच्या नेत्यांची फौज रणांगणात उतरली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, भाजपा-तृणमूल काँग्रेस यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडच्या काळात दुसर्यांदा पश्चिम बंगालचा दौरा केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचाही प्रचार दौरा झाला. अमित शाह यांच्या बंगाल दौर्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जास्तच आक्रमक झाल्या आहेत. अमित शहा व इतर नेत्यांचे राज्यातील दौरे व तृणमूलमधून होणारी नेत्यांची गळती हा योगायोग मानता येणार नाही. यामुळे येत्या काही दिवसांत हे राजकीय वैर आणखी तीव्र होईल, याची झलक आताच पहायला मिळत आहे.
लोकसभेच्या 2024 मध्ये होणार्या निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम बंगालची निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्याच्या उद्देशानेच भाजप प्रयत्नशील आहे. यामुळे निवडणुकीची कमान भाजपातर्फे पक्षातील क्रमांक दोनचे नेते अमित शहा यांनी हाती घेतली आहे, यावरुनच बरेच काही दिसून येते. 2011 पासून तृणमूल पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहे. गेल्या निवडणुकीत तृणमूलने 294 पैकी 220 जागा जिंकल्या; पण लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 जागांवर विजय मिळवून धक्का दिला. येत्या निवडणुकीत राज्याची सत्ता काबीज करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मोदी सरकार विरुद्ध ममतादीदी उघडपणे व आक्रमकतेने टीका करत असतात. त्यामुळे त्यांना सत्तेतून दूर करण्यास भाजपने प्राधान्य दिले आहे. तृणमूल काँग्रेसचा पराभव करणे एवढे सोपे नाही, याची अमित शहांसह सर्वांना कल्पना आहे. यामुळे भाजपाने तोडाफोडीचे राजकारण सुरु केले आहे. या रणणितीत भाजपाला यश देखील मिळत आहे, अर्थात यास ममता बॅनर्जींच कारणीभूत आहेत, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. ममतादिदी यांचा स्वभाव एककल्ली आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या निर्णयास विरोध केलेला त्यांना रुचत नाही. त्यामुळे जुने नेते व त्यांच्यातील मतभेदाची दरी रुंदावत गेली व असंतोष वाढत गेला. या असंतोषाचा भाजप फायदा घेणार हे नक्की. किंबहुना तो पक्ष या असंतोषामागे नसेल असे म्हणता येत नाही. तृणमूलमधील असंतोष भाजपच्या पथ्यावर पडत आहे. ममतादिदींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूलला रामराम करत भाजपात प्रवेश केला आहे. शुभेंदू अधिकारी हे बंगालच्या राजकारणातील मोठे नाव आहे.
सिंगूर येथील जमीन अधिग्रहणाच्या विरोधात हिंसाचार माजला, तेव्हा ममता तिथे जाऊन धरणे धरून बसल्या. त्यातून बंगालमध्ये राजकीय चमत्कार घडल्याचे सांगितले जाते; पण त्याचवेळी आणखी एका जागी तसाच हिंसाचार त्याच कारणस्तव माजलेला होता आणि त्या जागेचे नाव होते नंदीग्राम. तेथे ममता नव्हे तर शुभेंदू अधिकारी यांनी नेतृत्व केलेले होते. बंगालच्या राजकारणात अधिकारी यांच्या नावाचा मोठा दबदबा दिसून येतो. यामुळे त्यांच्या सोडचिठ्ठीची चर्चा तर होणारच! यापूर्वी 2017 मध्ये मुकुल रॉय हे देखील राज्यसभेचे सदस्यत्व सोडून भाजपत दाखल झाले होते. रॉय हे नाव देखील मोठे आहे. अधिकारी यांच्यापाठोपाठ तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने राजीनामा दिला. बरॅकपोर मतदार संघातून निवडून आलेले शीलभद्र दत्त यांनी पक्ष सोडताना आमदारपदाचा मात्र राजीनामा दिलेला नाही. पांडवेश्वर मतदार संघातील आमदार जितेंद्र तिवारी यांनीही पक्षत्याग केला. त्यानंतर 24 तासांच्या आत दत्त बाहेर पडले. विधानसभा निवडणूक जेमतेम चार-पाच महिन्यांवर आली असताना सुरु झालेली नेत्यांची गळती मुख्यमंत्री व पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यासाठी नक्कीच काळजीची बाब ठरली आहे. ममतांच्या भाच्याला पक्षात वारस म्हणून थोपण्याच्या प्रयत्नाने ही नाराजी आलेली आहे. त्यातच रणणीतीकार प्रशांत किशोर यांचीपक्षात चालवलेली ढवळाढवळ, बड्या नेत्यांच्या डोळ्यात खूपत आहे.
ममतांचा भाचा अभिजित बॅनर्जी व प्रशांत किशोरच्या मनमाननीने पक्षामध्ये असंतोष माजला आहे. जी आता भाजपाच्या पथ्यावर पडू लागली आहे. मात्र अशाप्रकारे केलेली तोडाफोडीचा बुमरँग देखील होवू शकतो, याचा अनुभव भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने घेतला आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी पवारांची साथ सोडावी यासाठी पायघड्या अंथरल्या. याची उलट प्रतिक्रिया होऊन राज्यातील सत्तेचे भाजपचे गणित बिघडले. अतिरेक केल्यास बंगालमध्येही तो अनुभव येऊ शकतो हे भाजपने विसरता कामा नये. विधानसभा निवडणुकीची औपचारिक घोषणा होण्याआधीच भाजपच्या नेत्यांची फौज रणांगणात उतरली आहे. यावरुन भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, यात कुणाचेही दुमत नाही. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक वाटावी, असे वातावरण भाजपकडून तेथे निर्माण केले जात आहे. नुकत्याच झालेल्या दौर्यातील रोड शोला मिळालेल्या प्रतिसादाचा संदर्भ देत अमित शहा यांनी भाजपला दोनशेहून अधिक जागा मिळतील, असे भाकित केले. बंगालमध्ये भाजपचा जनाधार वाढत आहे, असे त्या पक्षाचे नेते सतत सांगत आहेत. वातावरण निर्मितीसाठी असे दावे त्यांच्यासाठी गरजेचा भाग असू शकतो.
भाजपाला रोखण्यासाठी ममतांनी बंगाली अस्मितेचा मुद्दा पुढे केला आहे. बंगालमध्ये ममतांच्या अविरत संघर्षामुळेच कम्युनिस्टांचा अभेद्य गड कोसळला. तो चमत्कार करणार्या ममतांना त्यांच्या राजकीय जीवनातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कसोटीला सामोरे जायचे आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा मुद्दा भाजपकडून तापवला जाणार आहे. याचाच अर्थ उत्तर प्रदेशासारखे राज्य जिंकण्यासाठी जसा ध्रुवीकरणाचा आधार घेतला गेला तोच प्रयोग बंगालमध्ये राबवला जाईल. निवडणूक जशी जवळ येईल तसे राजकीय वातावरण अजून तापत जाईल. पूर्ण ताकद पणाला लावलेल्या भाजपचे आव्हान ममता बॅनर्जी कसे पेलणार हेे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.