डॉ.युवराज परदेशी: वर्ष 2020… या वर्षाची आठवण अनेक जण कधीच काढू इच्छिणार नाही. यावर्षाचे अशा काही घटना घडून गेल्या ज्यांच्या स्मृती कधीही मिटणार नाहीत. प्रत्येक वर्षी प्रमाणे हे वर्ष देखील जगात आनंद घेऊन आले. मात्र हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. चीनमधील वुहानमधून आलेला कोरोना एक महामारी बनला आणि संपूर्ण जगाला विळखा घातला. कोरोनाच्या नावे ठरलेल्या 2020 या वर्षात कोरोनाने जवळपास 17 लाख लोकांचा मृत्यू झाला, जवळपास 8 कोटी लोक संक्रमित झाले, अनेक देशांमध्ये अर्थव्यवस्था ढासळली आणि लोकांची जीवन जगण्याची पध्दत पूर्णपणे बदलली. इतिहासाच्या कालखंडात काही वर्षे अशीही होती, जेव्हा भीषण युद्ध किंवा मोठ्या नैसर्गिक संकटामुळे संपूण मानवजातीचे अस्तित्व पणाला लागले होते. अशा वर्षांमध्ये आता 2020 ची नोंद आवश्य होईल. असंख्य आठवणींना गोंदवून काही चांगल्या, काही वाईट, कधीही न विसरणार्या आठवणी मनात, डोळ्यात साठवून गेलेले हे वर्ष कोरोना व लॉकडाऊनच्या नावावर नोंदवले गेले. मात्र 2020 मध्ये निर्माण झालेली आव्हाने 2021 मध्ये धडे देणारी आहेत. त्यावर भविष्याचा पाया घडेल. आता प्रत्येकाचा जीवनाविषयीचा संकल्प आणखी दृढ झाला आहे, हे विसरुन चालणार नाही.
वाईट काळ लवकरात लवकर जावा, त्याची आठवणही येऊ नये, अशी मानवी स्वभावाची इच्छा असते. निसर्ग नियमांत हे शक्य नाही. 2020 या वर्षाच्या बाबतीत असेच म्हणावे लागेल. सरत्या वर्षात खूप काही घडून गेले. हा काळ सर्वाधिक आव्हानांचा होता मात्र सर्वात कठीण आव्हानेच आपणास सर्वात बळकट भविष्याचा पाया घालण्याची संधी देते. या काळाने आपणास लॉकडाऊनमध्ये प्रत्यक्ष गरजा किती कमी आहेत याचा अनुभव दिला. घरात संपूर्ण कुटुंबाने एवढा दीर्घ वेळ एकत्र घालवला. यामुळे एकमेकांविषयची जिव्हाळा, आपुलकी, प्रेम अधिक दृढ झाले, ही देखील 2020ची देणच म्हणावी लागेल. कोरोना आणि लॉकडाऊन व्यतिरिक्त गत वर्षात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला ढवळून निघाला. वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळ्याची धक्कादायक घटना 3 फेब्रुवारी 2020 रोजी घडली यामुळे समाजमन सुन्न झाले.
3 जून रोजी अलिबाग किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने सर्वाधिक नुकसान केले. या आपदेत अनेकांनी आपला जीव गमावला तर कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. याच वर्षात लॉकडाऊनमुे मोठ्या शहरांतून लाखो मजुरांचे वेदनादायी स्थलांतर पाहिले. आता केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी विधेयकामुळे शेतकरी गत महिनाभरापासून रत्यावर उतरले आहेत. देशातले आतापर्यंतचे हे सर्वात मोठे आंदोलन ठरत असून नवीन कृषी विधेयक मागे घेण्याची मागणी शेतकरी करीत आहे. पंजाब आणि हरियाणा येथील मोठ्याप्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. 2020 या निर्दयी वर्षाने आपल्याकडून खूप काही हिसकावून घेतले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, बॉलीवूड अभिनेता इरफान खान, ऋषी कपूर, सुशांतसिंग राजपूत, प्रसिध्द गायक पंडित जसराज, एसपी बालासुब्रमण्यम, प्रसिद्ध शायर राहत इंदौरी, काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल, राम विलास पासवान, प्रसिध्द उद्योगपती धर्मपाल सिंह गुलाटी, गुजरातचे माजी मुख्यमंत्रक्ष केशुभाई पटेल, राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमर सिंह, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा, सिध्दीविनायक समुहाचे अध्यक्ष कुंदन ढाके यांच्यासारखे दिग्गज आपल्याला सोडून गेले. या काही कटू आठवणी असल्यातरी दुसर्या बाजूला काही सुखद आठवणी देखील आहेत.
जगभरातील हिंदू धर्मासाठी श्रध्दा आणि भावनेचा मुद्दा असलेल्या अयोध्याच्या विवादित जमिनीचा निकाल लागल्यानंतर 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर निर्माणाचे भूमिपूजन करण्यात आले. संपूर्ण जगाला कोरोनाच्या विळख्यात ढकलणार्या चीन ने भारताच्या लद्दाख जवळील भागात घुसखोरी केली आणि पेनगॉन लेक भागावर स्वतःचा हक्क सांगितला. चीनने या भागात मोठ्याप्रमाणात सैन्य पाचारण केले आणि भारतावर दबाव बनविण्याचा प्रयत्न केला. परिणामी भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढत गेला. मात्र यावेळी भारताने आपली ताकद केवळ चीनच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिली. फेब्रुवारी 2020 मध्ये आलेल्या ‘वर्ल्ड पॉपुलेशन रिव्ह्यू’ च्या रिपोर्टनुसार, ब्रिटन आणि फ्रान्सला मागे सोड भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. व्हॅक्सीनच्या नावे 3 विक्रम नोंदवत कोरोनाच्या स्वदेशी लसीसह क्लासिकल स्वाइन फीव्हर, निमोनिया या लसी भारताने तयार केल्या. संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आल्यानंतर चीननंतर भारताने सर्वात जास्त पीपीई किट बनल्या त्या पाठोपाठ कोरोना व्हॅक्सीनचे डोसही बनणार आहे. येणार्या नव वर्षात भारताला अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
वर्क फ्रॉम होम आणि वर्क फॉर होम या दोन्ही संकल्पनांचे महत्व आता प्रत्येकाला पटलेले आहे. यामुळे नवं वर्षात घर आणि घराबाहेरील जबाबदार्या सांभाळतांना नवा दृष्टीकोन मिळाला आहे, जो येणार्या काळात निश्चितपणे प्रेरणादायी ठरणार आहे. 2020 ला निरोप देताना येणारे नूतन वर्ष कसे असेल? या प्रश्नाने अनेकांच्या मनात काहुर माजविले असले तरी, मावळत्या वर्षाच्या सर्व कटू आठवणींना बाजूला सारत येणार्या वर्षाच्या तयारीला लागले पाहिजे. सरत्या वर्षाचा लेखा-जोखा मांडतांना ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होणार नाहीत याचा संकल्प करून नवी उमेद, नव्या आशा-आकांक्षा, घेऊन येणार्या नव्या वर्षाची, नाविन्याची कास धरत त्याचे जल्लोषात स्वागत करुया. नवी स्वप्न साध्य होण्यासाठी योग्य आखणी करुन त्या मार्गाने चालतांना परिश्रम यांची शिकस्त करण्यासाठी मनाची तयारी करुया. नव वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!