भंडाऱ्याची घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील लाजिरवाणी घटना: फडणवीस

0

भंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु केअर युनिटला मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे दुर्दैवी आणि वेदनादायी घटना घडली आहे. संपूर्ण देशात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. प्रगतीशील महाराष्ट्रात दहा नवजात बालकांचा मृत्यू आयसीयूमध्ये व्हावा, यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही, असे म्हणत याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील ही काळी घटना आहे. फायर ऑडिट का झाले नाही? याची चौकशी व्हावी. यावर राजकारण करायचे नाही, मात्र ज्यापद्धतीने दावे केले जात आहे, त्यात अर्थ नसून ते चुकीचे आहेत. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखाची मदत द्यावी, अशीही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिटचा प्रस्ताव 12 मे 2020 रोजी रुग्णालय प्रशासनाने आरोग्य उपसंचालक यांच्या मार्फत संचालक यांच्याकडे पाठविला होता, परंतु त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी हा हलगर्जीपणा केला आहे, त्या सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.