विद्यार्थ्यांना इसिएने केले मार्गदर्शन
रावेत : शहरातील एस.बी.पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या घरातील ई वेस्ट शाळेत जमा केले आहे. शाळेतील 2130 विद्यार्थ्यांनी इसिए संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला. मोबाईल चार्जर, बंद पडलेले मोबाईल आदी मुलांनी शाळेत आणून जमा केले व समारंभ पूर्वक मोठ्या जवाबदारीने इसिएच्या ताब्यात दिले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मधुबाला गैरला, पद्मावती बंडा, वर्षा देशमुख आणि 108 शाळा शिक्षक उपस्थित होते. इसिएचे प्रभाकर मेरुकर, सुभाष चव्हाण, विकास आंबले आदी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन समिती गेल्या 16 वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केंद्र बिंदू मानून त्यांच्यावर पर्यावरण संवर्धनाचे संस्कार करण्याचा प्रयत्न करते आहे. आज प्रत्येक तरुण विद्यार्थी पर्यावरण संवर्धनाच्या कामी स्वतःला वाहून घेताना दिसतो आहे. विद्यार्थ्यांना घन कचरा व्यवस्थापनाचे संस्कार होत आहेत आणि ही चळवळ भविष्यात चालू राहणार आहे. यानिमित्त इसिए अध्यक्ष विकास पाटील यांनी सर्व शाळांना आवाहन केले आहे की, प्रत्येक शाळेने असे उपक्रम राबवावेत व इ-कचरा बाबत समाजात जनजागृती करावी.