उत्राणसह हनुमंतखेडे सीम येथे वाळूचा अवैध उपसा सुरुच

शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन
एरंडोल।
तालुक्यातील उत्राण येथील गिरणा नदी पात्रातून शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करून ठेकेदार जेसीबीद्वारे वाळूचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणावर करीत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. रात्रभर अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. तसेच हनुमंतखेडे सीम येथे सुद्धा हाच प्रकार दिसून येतो. महसूल प्रशासन याबाबत डोळ्यावर कातडे ओढत आहे.

राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी अवैध वाळू प्रकरणात सक्रिय झालेले दिसून येतात. किंबहुना त्यांच्या माध्यमातून अवैध वाळू वाहतुकीला प्रोत्साहन दिले जात असल्याची टीका होत आहे. अशा दलाली करणार्‍या राजकीय कार्यकर्त्यांचे महसूल यंत्रणेतील अधिकार्‍यांशी साटेलोटे असल्याची टीका केली जात आहे. हनुमंतखेडे सीम येथे गिरणा नदीच्या पात्रातून रोज रात्री 20 ते 30 ट्रॅक्टर व डंपर वाळू चोरी करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. हनुमंतखेडे सीम येथील पर्यावरण प्रेमी मंडळी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून तक्रारी केलेल्या आहेत. परंतु वाळू चोरांकडे हेतुतः दुर्लक्ष केले जात आहे काय? अशी शंका तक्रारदार व्यक्त करीत आहेत. तक्रार केल्यावर तेवढ्यापुरते वाळूचोरी बंद झाल्याचे नाटक केले जाते. पुन्हा काही दिवसांनी मोठ्या जोमाने वाळू चोरीचा गोरखधंदा सुरू होतो. असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. परवानगी नसताना कुणाच्या आशीर्वादाने दररोज रात्री 400 ते 500 ब्रास वाळूची चोरटी वाहतूक होत आहे.

वाळू चोरी प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून खोल चौकशी होऊन या प्रकरणात गुंतलेले गाव पातळीवरील लोकप्रतिनिधी व एरंडोल शहरासह तालुक्यातील समाजसेवेचा आव आणणारे राजकीय कार्यकर्ते यांचा पर्दापाश करावा व त्यांचा खरा खुरा चेहरा जनतेसमोर आणावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.