सबॉर्डिनेट इंजिनिअर्सने साजरा केला आगळा वेगळा महिलादिन

रिंग रोड उपकेंद्र येथे केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

अनंत अडचणींचा सामना करत स्वतःच्या करिअरसह नृत्य कलेचा छंद जोपासणाऱ्या मानसी पाटील व चित्रकार कादंबरी चौधरी यांचेसह महावितरण मधील महिला अधिकारी/कर्मचारींचा महिला दिनाचे औचित्य साधून सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन मार्फत सन्मान करण्यात आला.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतांना वडील मोलमजुरी करून परिवाराचे पालनपोषण करत होते तशातच दुर्दैवाने अपघातात पाय गमवावा लागलेल्या जळगावच्या मानसी पाटीलने नियतीने जे दिलं आहे त्याबद्दल मनात कसलाही किंतु परंतु न बाळगता स्वतःच्या शिक्षणासोबतच नृत्य कलेचा छंद जोपासला आहे. फक्त एका पायावर धडपड करत असलेली मानसी ही ज्यांना सुदैवाने सर्व काही चांगलं लाभलेलं आहे अशा सर्वांसाठीही एक आदर्श आहे. बी कॉम झाल्यानंतर मानसी आता पार्ट टाइम नोकरी करत MBA देखील करत आहे.
विद्यार्थी दशेत असतांनाच एका शेतकरी कुटुंबातील युवती कु. कादंबरी चौधरी हिने केवळ छंद म्हणून चित्रकला जोपासत चित्रकलेच्या माध्यमातून आपला लौकिक सातासमुद्रापार निर्माण केला आहे. म्हणून तिचा तसेच स्वतःच्या कौटुंबिक जाबदाऱ्या पार पाडत महावितरणमध्ये अविरत सेवा बजावणाऱ्या महिला अभियंता व कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करुन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला एस. ई. ए. च्या माजी विभागीय सचिव अभि. सौ. रत्ना पाटील,अभि. श्रीमती माधुरी पाटील,अभि. सौ. घायवट, तसेच सौ. संध्या पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एस. ई. ए. चे राज्य उपाध्यक्ष अभि. पराग चौधरी, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. गौरी चौधरी तसेच जळगांव एस. ई. ए. चे सहसचिव अभि. कुंदन भंगाळे, जळगांव मुख्यालयाचे सहसचिव अभि. योगेश भंगाळे, सर्कल सचिव देवेंद्र भंगाळे व सुहास चौधरी यांचेसह एस. डी. चौधरी उपस्थित होते.
महावितरणच्या रिंग रोड उपकेंद्र परिसरात अभि मिलिंद ईंगळे, विजय मराठे व रिंग रोड उपकेंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन केले.