सहा.निरीक्षकाला धक्काबुक्की : आरोपी जाळ्यात

वरणगाव पोलिस ठाण्यातील धक्कादायक प्रकार : अटकेतील आरोपींना भेटू न दिल्याने पोलिसांनाच केली शिवीगाळ

भुसावळ : वरणगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या बंधूंना भेटण्यासाठी गेलेल्या गिरीश तायडे यांना संशयीत आरोपींना भेटू न दिल्याने त्यांनी मद्यधूंद अवस्थेत पोलिस कर्मचार्‍यांना शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा आणला शिवाय वरणावचे सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांना धक्काबुक्की करीत त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही दिली. 14 रोजी रात्री दहा वाजता ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तायडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

पोलिस ठाण्यातच घातला गोंधळ
कॉन्स्टेबल अतुल भगवान बोदडे यांनी या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीचा आशय असा की, रविवारी रात्री दहा वाजता संशयीत आरोपी गिरीश देविदास तायडे (36, खडका, ता.भुसावळ) हे पोलिस ठाण्यात मद्यधूंद अवस्थेत आल्यानंतर त्यांनी अटकेतील आरोपींना भेटण्यासाठी आग्रह धरला मात्र भेटू न दिल्याने त्यांनी मद्यधूंद अवस्थेत सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे, उपनिरीक्षक सुनील वाणी, एएसआय अनिल चौधरी, कॉन्स्टेबल राहुल येवले, कॉन्स्टेबल राजहंस, कॉन्स्टेबल भूषण माळी, चालक प्रमोद कंखरे आदींना शिवीगाळ केली तसेच सहा.निरीक्षक बोरसे यांना धक्काबुक्की करीत मी यापूर्वी पवार साहेबांवर अ‍ॅन्टीकरप्शनची केस केली आहे, तुम्हालादेखील तसेच फसवेल, अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा आणला. आरोपीची अंगझडती घेतली असता एक धारदार छोटा चाकू आढळल्याने तो जप्त करण्यात आला. तपास उपनिरीक्षक सुनील वाणी करीत आहेत.