शिंदे, खडसे, पाटील यांनी रचला सत्तांतराचा पाया
महाजनांच्या नेतृत्वाला सुरूंग ; जळगाव महापालिकेत सत्ता परिवर्तन
जळगाव – माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व असलेल्या जळगाव महापालिकेत भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी अडीच वर्षापुर्वी एकहाती सत्ता मिळविली होती. ‘सत्ता द्या वर्षभरात विकास करून दाखवतो’ असे वचनही आमदार महाजन यांनी जळगावकरांना दिले होते. मात्र या वचनाला ते खरे उतरले नाही. त्यामुळे मोठ्याप्रमाणात नाराजी वाढली. या नाराजीचा फायदा उचलून शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या त्रिमुर्तींनी जळगाव महापालिकेत सत्तांतराचा पाया रचला आणि आमदार महाजनांच्या नेतृत्वाला सुरूंग लागला.
जळगाव महापालिकेत आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर तर भाजपाचे बंडखोर नगरसेवक कुलभूषण पाटील हे उपमहापौर म्हणून निवडून आले. महापालिकेत झालेल्या या सत्तांतरासाठी पडद्याआड मोठ्या हालचाली झाल्या. आमदार गिरीश महाजन यांना ‘दे धक्का’ देण्यासाठी समीकरण जुळवुन आणण्यात आले.
खडसेंचा ठाकरेंना फोन अन् सत्तांतराचे बीज
राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कामानिमीत्ताने फोन केला होता. यावेळी खडसेंनी जळगावशी संबंधीत समस्या मार्गी लावण्याची विनंती केली. त्यावर ठाकरेंनी निवडणूक कधी आहे? अशी विचारणा केली. खडसेंनी निवडणूकीला वेळ आहे पण महापौर पदासाठी निवडणूक होणार असल्याचे सांगत तुम्ही सांगाल तर शिवसेनेचा महापौर करता येईल असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त याप्रमाणे खडसेंनी शिवसेनेचा महापौर बसविण्यासाठी पुढाकार घेतला. यात मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सोपविली आणि इथुनच या सत्तांतराच्या प्रक्रियेला सुरवात झाली. खडसे यांनी त्यांच्या मर्जीतले २२ नगरसेवक हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केले होते. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनीही या नगरसेवकांना ना. एकनाथ शिंदेंच्या देखरेखीखाली ठेवले.
महाजनांच्या नेतृत्वाला सुरूंग
भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे राज्यातील नेतृत्वाशी जवळचे संबंध असले तरी जिल्ह्यात मात्र त्यांच्या राजकीय शत्रुंमध्ये वाढच झाली होती. एकनाथराव खडसे, गुलाबराव पाटील या दोन्ही नेत्यांशी निवडणुकीच्या मुद्यावरून संबंधांमध्ये कमालीचा दुरावा आला. त्यामुळे महाजनांच्या नेतृत्वाला सुरूंग लावण्यासाठी संधीच्या शोध घेतला जात होता. अखेर महापौर पदाच्या निवडणुकीच्या निमीत्ताने खडसे आणि गुलाबराव पाटील यांना ही संधी गवसली आणि महापालिकेत सत्ता परिवर्तन करीत आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वालाच सुरूंग लावण्यात आला.