कोविड रिपोर्ट निगेटिव्ह असल्यावरच मिळणार गुजरात मध्ये एन्ट्री

नवापूर- महाराष्ट्र राज्यात दररोज २५ ते ३० हजार कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने गुजरात सरकार सतर्क झाले आहे. महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात जाणारे लोकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जाणार आहे अन्यथा परतीचा प्रवास करावा लागणार आहे.असे परिपत्रक काल संध्याकाळी गुजरात आरोग्य विभागाने काढले आहे. यावर गुजरात पोलीसांनी अंमलबजावणी सुरू केली आहे.

उच्छल पोलिसांनी महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील तपासणी नाक्यावर आरोग्य विभाग व पोलीस दलाचे पथक तैनात करण्यात आली आहेत.महाराष्ट्रातून गुजरात राज्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांची तपासणी सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभाग व पोलिस दलाला देण्यात आले आहे.

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जात आहे अन्यथा महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्छलहून महाराष्ट्रात परत पाठविण्यात येत आहे. गुजरात राज्यातील आरोग्य पथक 24 तास सीमावर्ती भागात वाहन चालकाची थर्मल स्कॅनिंग, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याचा तपास करीत आहे.

तोंडाला मास्क नसल्यास गुजरात पोलीस एक हजार रूपयांचा दंड महामार्गावर वसूल करीत आहे. महाराष्ट्र पासिंग फोर व्हीलर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जात आहे.जळगाव व धुळे जिल्ह्यातील अनेक वाहनचालकांचे कुठलेही कारण ऐकून न घेता परतीचा प्रवास करावा लागला आहे.

गुजरात राज्यात जाण्यासाठी कोरोना रॅपिड किंवा आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट असणे गरजेचे आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील लोक मोठ्या संख्येने गुजरात राज्यात कोरोनाचा उपचारासाठी जात असल्याने त्यांची मोठी फसगत होणार आहे. नवापूर सीमा तपासणी नाक्यावर रॅपिड टेस्टिंग चे कॅम्प लावण्याने गुजरात राज्यात जाणाऱ्यांची सोय होईल अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.