अरुणावती नदी पुलावर मालट्रकच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

 शिरपूर – शहरातील खंडेराव बाबा मंदिर जवळील अरुणावती नदी पुलाच्या सुरुवातीस मालट्रकच्या धडकेत एक अनोळखी वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना घडली . हा अपघात आज  दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील श्री खंडेराव महाराज मंदिराजवळ झाला. मालट्रक क्रमांक एम एच 18 एए 8157 ही शिरपूर कडून खर्डेकडे भरधाव वेगाने जात असतांना अरुणावती पुलाच्या वळणावर ब्रेक न लागल्याने समोरून येणारा एका अनोळखी वृद्धाला जोरदार धडक दिली या धडकेत वृद्धाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.अपघाताची माहिती जमलेल्या लोकांनी पोलिसांना कळविल्यानंतर लागलीच पीएसआय संदीप मुरकुटे,पोलीस कॉन्स्टेबल उमेश पाटील, स्वप्निल बांगर ,अमित रणमाळे, बापूजी पाटील पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मयत वृद्धाची ओळख पटली नसून त्यास कुटीर रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. 
       प्रामुख्याने या प्रकारचे अपघात राष्ट्रीय महामार्गावरील टोल वाचवण्यासाठी खर्दे उंचावद मार्गे येणाऱ्या वाहनांमुळे नेहमीच घडत असल्याने आता तरी प्रशासनाने या रस्त्याच्या वापर करणाऱ्या वाहनांवर निर्बंध लावावेत म्हणजे अशा प्रकारचे अपघात घडणार नाहीत अशी एकच चर्चा त्या ठिकाणी बघ्यांकडून सुरू होती.