नंदुरबार। जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्यांच्या संगनमताने जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठा घोळ सुरू असल्याचा गंभीर आरोप खा. डॉ. हिना गावित यांनी पत्र परिषदेतून केला आहे. यावेळी आ. डॉ.विजयकुमार गावित उपस्थित होते.
कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शन वेळेत मिळत नसल्याने अनेक रुग्ण दगावले आहेत. इंजेक्शन पुरवठा करण्यात जिल्हाधिकार्यांचे नियोजन चुकल्याने नंदुरबारसाठी मिळणारे इंजेक्शन थेट पुणे मुंबईसारख्या शहरात जात असल्याचा आरोपही खा.डॉ.हिना गावित यांनी केला. कोविड रुग्णालयांसाठी इंजेक्शनचा पुरवठा केल्याचे आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसारित केली आहे. ती चक्क दिशाभूल करणारी आहे. प्रत्यक्षात रुग्णालयांना कमी प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. मात्र, जिल्हा प्रशासनाने ती आकडेवारी मोठ्या प्रमाणावर दाखवून दिशाभूल केली आहे. त्यामुळे इंजेक्शन वितरणात मोठा घोळ होत असल्याचा आरोप खा.डॉ.हिना गावित यांनी केला.
पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
इंजेक्शन वितरणाच्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकारी व अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. त्याची पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांकडे चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही खा. हिना गावित यांनी पत्र परिषदेत सांगितले.