आईच्या दुधातून कोरोनाचा संसर्ग होत नाही – डॉ.नंदिनी आठवले

कोविड आणि बालरुग्ण' विषयावर आयएमएतर्फे तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जळगाव – सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत असून दुसऱ्या लाटेत बालकांना देखील कोरोनाचा संसर्ग होत आहे. बालकांना स्वतःला कोरोनापासून धोका असला तरी ते सुपर स्प्रेडर ठरत आहेत. बालकांमुळे इतरांना विशेषतः वृद्धांना कोरोनाचा धोका अधिक आहे. बालकांना काही त्रास झाल्यास पालकांनी मनाप्रमाणे किंवा सोशल मीडियात येणारे उपाय न करता वेळीच बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जळगाव शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञांनी दिला.याच बरोबर डॉ.नंदिनी आठवले म्हणाल्या की, स्वतः पालकांनी मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर राखण्याचे पालन केले तर मुलं नैसर्गिकरित्या त्याचा अवलंब करतात. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोविडग्रस्त बालकांची संख्या नक्की वाढली आहे. लहान मुलांमध्ये रेमेडीसीवर, फॅबीफ्ल्यू, स्टिरॉईड आदी औषधे देत नाही. पालकांनी स्वतःच्या मनानुसार औषधी देणे टाळावे. स्तनपान करणाऱ्या कोविडग्रस्त मातांनी मास्क व सॅनिटायझर या प्रतिबंधात्मक गोष्टींचा वापर करणे गरजेचे असते. आईच्या दुधातून कोरोनाचा संसर्ग होत नाही
आयएमए जळगावतर्फे रविवार दि.१९ रोजी ‘कोविड आणि बालरुग्ण’ या विषयावर आज तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्रात प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.नंदिनी आठवले, डॉ.राजेंद्र पाटील, डॉ.राजेश पाटील, डॉ.दीपक अटल, डॉ.अविनाश भोसले हे सहभागी झाले. उपक्रमासाठी आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी, सचिव डॉ.राधेश्याम चौधरी यांनी परिश्रम घेतले.
डॉ.राधेश्याम चौधरी यांनी सूत्रसंचालन करताना जळगाव आयएमएतर्फे गेल्या आठवड्यात कोरोना आणि मानसिक स्वास्थ्य या विषयी उपक्रम राबविला असल्याची माहिती दिली. तसेच लहान बालके हे कुटुंबाच्या काळजीच्या केंद्रस्थानी असतात तसेच बऱ्याचदा ते लक्षणे नीटपणे सांगू शकत नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये कोविडनिदान उशिरा होते. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर त्यांच्याकडून नीटपणे होत नाही. आज लहान बालकांमधील कोरोनाचा आजार याबद्दल पालकांमध्ये अनेक प्रश्न असून त्याचे निरसन करण्यासाठी जळगाव आयएमएतर्फे चर्चासत्र राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
त्रिसूत्रीचा वापर करा व त्यासाठी आग्रह धरा
डॉ.राजेंद्र पाटील यांनी सांगितले की, लहान मुलांमध्ये ताप हे सर्वात महत्वाचे लक्षण आहे. सर्दी, खोकला, धाप लागणे या बरोबरच हात पाय दुखावणे, जेवण व खेळणे बंद होणे आदी लक्षणे प्रामुख्याने जाणवतात. आतापर्यंत कोविडच्या लसीची लहान मुलांमध्ये सुरक्षितता ही सिद्ध व्हायची आहे म्हणून १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांना कोविड लस दिली जात नाही. स्वतः प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचा वापर करा आणि समोरच्याला देखील त्यासाठी आग्रह धरा असा सल्ला त्यांनी दिला.
गर्भवती मातेपासून बाळाला रक्ताद्वारे कोविडचे संक्रमण नाही
डॉ.राजेश पाटील म्हणाले की, गर्भवती मातेपासून बाळाला रक्ताद्वारे कोविडचे संक्रमण होत नाही. कोविडग्रस्त मातेच्या बाळाची आरटीपीसीआर चाचणी ४-५ दिवसांनी पुन्हा करावी. अशा बाळाला स्तनपान मास्क, सॅनिटायझरची खबरदारी घेऊन दिलेच पाहिजे. ५ वर्षापर्यंतची बाळ लक्षणे व तक्रारी नीट सांगू शकत नाही म्हणून त्यांच्यातील कोणताही ताप हा कोरोनासदृश्य समजून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्तनपान करणारी आई कोविडची लस घेऊ शकते असे त्यांनी सांगितले.
कोविडग्रस्त मातेच्या नवजात अर्भकाला पोलिओ, बीसीजी देण्यास हरकत नाही
डॉ.दीपक अटल म्हणाले की, कोविडग्रस्त मातेच्या नवजात अर्भकाला पोलिओ आणि बीसीजी या लसी देण्यास हरकत नाही. कोणतेही बाळ कोविडग्रस्त असल्यास लसी ४ ते ६ आठवडे उशिराने द्याव्यात. लहान बाळांमध्ये एचआरसीटी स्कॅनचा आग्रह धरू नये, कारण या एका चाचणीत १०० एक्सरे एवढे रेडिएशन वापरले जाते त्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो. पालकांनी स्वतः कोविडग्रस्त असल्यास किंवा बालक कोविडग्रस्त असल्यास सर्व प्रतिबंधात्मक खबरदारी घेऊन डॉक्टरांची फोनवर विशिष्ट वेळ घेऊनच तपासणीला जावे, असा सल्ला त्यांनी दिला.
लहान मुलांना चौकटीत न ठेवता स्वातंत्र्य द्या
डॉ.अविनाश भोसले म्हणाले की, कोरोनामुळे कुटुंबात तणाव व भीतीचे वातावरण आहे. या परिस्थितीत लहान बालकांचे भावनिक आरोग्य जोपासणे महत्वाचे आहे. त्यांच्यासोबत खेळताना, हितगुज करताना त्यांच्या स्तरावर जाऊन वागावे. जबरदस्ती किंवा क्षमता तपासण्याचा प्रयत्न करू नका. खेळाच्या किंवा संवादाच्या चौकटी न लादता त्यांना स्वातंत्र्य द्या. नवजात अर्भकाचे उपचार करताना वेगळ्या कक्षात सर्व प्रतिबंधात्मक खबरदारी घेत बाळाचा ताप, श्वास आणि रक्तातील साखर यांना विशेष महत्व दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.