जळगाव- फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणावे, म्हणून जळगावातील माहेरवासीण व पातरखेडा येथील एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पोलीस पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
अश्विनी महेंद्र पाटील हिचा विवाह पातरखेडा (ता.एरंडोल) येथील महेंद्र भगवान पाटील याच्याशी सन 2010 मध्ये झाला. या विवाहितेचा पती मुंबईत पोलीस कॉन्स्टेबल आहे. लग्नात मानपान मिळाला नाही, हुंडा कमी दिल्याबाबत विवाहितेला सासरची मंडळी टोमणे मारीत होते. विवाहितेला दागिन्यांची मागणी करुन तिला माहेरी पाठवण्यात आले. परंतु, नातेवाईकांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला. त्यानंतर विवाहिता सासरी नांदायला लागली. मात्र, तिला कौटुंबिक कारणावरुन त्रास देण्यात आला. गर्भवती असताना देखील सासू सरलाबाई भगवान पाटील, जेठ दीपक भगवान पाटील, जेठाणी उज्ज्वला दीपक पाटील, नणंद मनीषा संजय बोरसे (रा.पातरखेडा) यांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तर तिचा पती दारू पिऊन त्रास देत होता.
या विवाहितेला तिचा पती मुंबईला घेवून गेला. त्याने पत्नीच्या नावे ऑनलाइन कर्ज काढले. परंतु, कर्जाचे हप्ते व्यवस्थित न भरल्यामुळे फायनान्स कंपनीकडून कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू झाला. या प्रकाराला कंटाळून महिला माहेरी आली. याप्रकरणी तिने पतीसह पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Prev Post