घरफोडी, सोनसाखळ्या लांबवल्याप्रकरणी तिघांना अटक

पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

जळगाव- जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोडी, जबरी चोरी आणि सोनसाखळ्या लांबविल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
विविध ठिकाणी चोरी, घरफोडी, जबरी चोरीसारखे 26 गुन्हे केलेला संशयित आरोपी भूषण ऊर्फ जिगर रमेश बोंडारे (रा.उमाळा) हा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केल्यापासून गावातून निघून गेला होता. त्याच्यावर एमआयडीसीसह रामानंदनगर, शनिपेठ, अडावद, जिल्हापेठ, एरंडोल, धरणगाव, जामनेर आदी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्याच्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. भूषण हा सध्या औरंगाबादमधील उस्मानपुरा भागात राहतो. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून भूषणला ताब्यात घेतले. भूषण याने सांगितले की, त्याच्या गावातील अजय सुदाम भील, औरंगाबाद येथील मित्र बंटी ऊर्फ प्रथमेश पाटील, पवन विश्‍वनाथ अग्रवाल व मनोज भांबडे (वाळूज) यांनी रस्त्यावरील एका कारचालकास हात देवून थांबवले. ते कारमध्ये बसले. त्यांनी उमाळ्याकडे येत असताना कारचालकास पिस्तूल लावले व त्याच्या डोळ्यात मिरचीची पावडर फेकली. त्याच्या जवळील रक्कम व मोबाइल हिसकावून त्यास कारमध्ये सोडून ते पसार झाले. भूषण याने घरफोडीचे दोन गुन्हे केल्याचीही कबुली दिली आहे, असेही अधीक्षक डॉ.मुंढे यांनी सांगितले.
सोनसाखळी चोरट्यांचा राज्यात उपद्रव……
भुसावळ येथील तौफिक हुसेन जाफर हुसेन (वय 18, रा.खानका मदरसा परिसर), सोहेलअली युसूफअली (इराणी मोहल्ला)) हे जिल्ह्यासह महाराष्ट्रात सोनसाखळ्या लांबवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ते मालेगाव परिसरातील गुन्ह्यांनंतर काही दिवस परळी वैजनाथ येथे राहत होते. दोघं भुसावळ येथे आल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक बकाले यांना मिळाली होती. त्यास पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याने भुसावळमधील गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने गुन्ह्यातील मुद्देमाल भुसावळ येथील हरिचंद्र दत्तात्रय इखणकर (वय 25, सराफ गल्ली) यास विकल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना मुद्देमाल व मोटारसायकलसह ताब्यात घेतले, असेही अधीक्षक डॉ.मुंढे यांनी सांगितले.