शिवसेना भाजप नगरसेवक भिडले

जळगाव शहर महापालिकेची बुधवारी ऑनलाईन महासभा पार पडली. या महासभेत महागोंधळ पाहायला मिळाला. महासभा सुरु झाल्या झाल्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णयाचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर आणण्यात आला आणि मंजूरही झाला. भाजपने या बाबत तटस्थतेची भुमिका घेतली. याच बरोबर शहरातील कचरा संकलन करणार्‍या वॉटरग्रेस कंपनी आणि महापालिका प्रशासनात लवाद नेमण्याचा ठरावही शिवेसेनेतर्फे बहुमताने पारित करण्यात आला. या दोन्ही विषयावरून भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेने हे दोन्ही विषय बहुमताच्या जोरावर मंजुर केले. मात्र, महासभा ऑनलाईन असताना बहुमत कसे सिद्ध केले, असा जाब विचारत भाजपचे काही सदस्य थेट सभागृहात दाखल झाले. यावेळी दोन्ही पक्षातील सदस्य आक्रमक झाल्याने जोरदार गोंधळ उडाला.
महासभेत गाळ्यांचा विषय बहुमताने मंजूर झाल्यानंतर भाजपचे गटनेते भगत बालाणी, सदस्य कैलास सोनवणे, अ‍ॅड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी, धीरज सोनवणे यांनी ऑनलाईन पद्धतीने विरोध नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळात हा विषय मंजूर झाला. त्यानंतर लवाद नेमण्याचा विषय नगरसचिव गोराणे यांनी वाचायला घेतला. हा विषय देखील बहुमताने मंजूर होत असल्याने भाजपचे सदस्य आक्रमक झाले. भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, धीरज सोनवणे आदी थेट सभागृहात दाखल झाले. त्यांनी हे दोन्ही विषय बहुमताने मंजूर केल्याबाबत आक्षेप घेतला. शिवसेनेने बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने वाद झाला.हा गोंधळ वाढत गेल्याने शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सदस्य प्रशांत नाईक, विष्णू भंगाळे, गटनेते अनंत जोशी, नितीन बरडे हे देखील सभागृहात दाखल झाले. त्यामुळे गोंधळ वाढला. त्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी ही महासभा ऑनलाईन असल्याने सदस्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले.

 

समिती गठीत करुन धोरण ठरवावे
मनपा मालकीच्या जागेवर बीओटी तत्त्वावर स्वच्छतागृह बांधण्यास खासगी संस्थांच्या अर्जाबाबत धोरण ठरविण्याच्या प्रस्तावावर अ‍ॅड. शुचिता हाडा यांनी आक्षेप नोंदविला. त्या म्हणाल्या की, संस्थेच्या नावांची निवड कशाच्या आधारावर ठरविली याचा प्रशासनाने खुलासा करावा. यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करुन धोरण ठरवावे. या समितीकडून चार दिवसात तपासणी करुन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करीत या प्रस्तावावर विरोध दर्शविला. स्वच्छतागृहांसाठी शहरातील 21 जागांची निवड करण्यात 8 जागांसाठी अनेक संस्थांकडून मागणी आहे. गाळेधारकांचे आंदोलन

मनपा मालकिच्या मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत महासभेत धोरणात्मक निर्णयाविरोधात गाळेधारकांनी महानगरपालिकेसमोर कुटूंबियांसह आंदोलन केले. यावेळी पंकज मोमाया, रिझवान जहाँगिरदार, आशिष सपकाळे, हेमंत परदेशी, शिरीष थोरात, संतोष अत्तरदे, अशपाक अन्सारी, दिलीप साळुंखे, वसंत भावसार, बापू कोल्हे, अमोल वाणी, किशोर सोनवणे, गोपाल बजाज, कमल तलरेजा, दिनेश वालेचा, शंकर वदवानी, मिनाक्षी सपकाळे, सलोनी परदेशी आदी गाळेधारक उपस्थित होते. मनपा प्रशासनाने शासन जोपर्यंत निर्णय घेणार नाही. तोपर्यंत मनपा प्रशासनाने निर्णय घेवू नये. तसेच जे 16 अविकसित, अव्यावसायिक मार्केट आहेत. त्या मार्केटमध्ये अडीच ते तीन टक्के भाडे आकारणी करावी. पाचपट दंड रद्द करावा. अशी मागणी जळगाव शहर मनपा गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी केली आहे.

पिंप्राळ्यात रुग्णालय बांधण्याच्या
प्रस्तावाला अ‍ॅड. हाडा यांचा विरोध
पिंप्राळा येथे मोकळ्या जागेवर मनपाचे रुग्णालय बांधण्याच्या प्रस्तावावर नागरिकांचा विरोध असल्याचे सांगत अ‍ॅड. शुचिता हाडा यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला. त्या म्हणाल्या की, कोणताही ओपन स्पेसवर बांधकाम न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यावर प्रशासनातर्फे खुलासा सादर करण्यात येवून रुग्णालय बांधण्यासाठी येथील रहिवाशांकडून मत घेतली जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, वॉटरग्रेसच्या कामात सुधारणा करण्याची मागणी नगरसेविका ज्योती चव्हाण यांनी केली. तसेच वॉटरग्रेस आणि मनपा प्रशासनात लवाद नेमण्याच्या विषयावर अनेक नगरसेवकांचा संभ्रम निर्माण झाल्याचेही त्या म्हणाल्या.

अपात्रतेचा ठरावही मंजूर
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा भोगलेले विद्यमान नगरसेवक भगत बालाणी, कैलास सोनवणे, दत्तात्रय कोळी, सदाशिव ढेकळे आणि लताताई भोईटे या पाच नगरसेवकांना अपात्र करण्याच्या ठरावावर भाजपने विरोध केला. दरम्यान, सत्ताधार्‍यांनी हा ठराव बहुमताने मंजूर केला. यावर आयुक्तांनी विधितज्ज्ञांकडून अभिप्राय घेतल्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचा खुलासा केला.

शिवसेनेकडे बहुमत नाही : भाजपा
ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या महासभेमध्ये शिवसेना बहुमताने एकावर एक प्रस्ताव रेटत असताना शिवसेनेकडे बहुमतच नाही असा आक्षेप भारतीय जनता पक्षातर्फे घेण्यात आला. शिवसेनेकडे 42 नगरसेवकांचा पाठिंबा आहे असे महापौर जयश्री महाजन म्हणत आहेत मात्र या ऑनलाईन महासभेत केवळ 56 सदस्य उपस्थित होते ज्यातील काही हे अधिकारी आहे आणि भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे असे काही नगरसेवक देखील उपस्थित आहेत. यासाठी एक दिवस अगोदरच शिवसेनेने आपल्या सदस्यांच्या सह्या नोंदवून घेतले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आला.