रस्त्यांच्या डागडुजीचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण करायचा मानस
महापौर जयश्री महाजन यांची जनशक्तीला महिती
जळगाव – शहरात गेल्या अडीच वर्षापासून अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. या कामांमुळे जळगाव शहरात रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. हे अमृत योजनेचे काम आता लांबणीवर पडल्यामुळे जळगाव शहरातील रस्त्याचे काम नक्की होणार तरी कधी असा प्रश्न जळगावकरांना पडला आहे. याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी ’जनशक्ती’ ने महापौर जयश्री महाजन यांच्याशी संपर्क साधला. त्या म्हणाल्या की शहरातील रस्त्यांच्या डागडुजीचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण करायचा मानस आहे. मात्र कोरोनामुळे मजुरांच्या अभावी काम पूर्ण होण्यास एखादवेळेस अडचण येऊ शकते.
पावसाआधी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न.
जळगाव शहरात सध्या रस्त्यांच्या कामाला मोठ्याप्रमाणावर गती मिळाली आहे. शहरातील काही ठिकाणच्या रस्त्यांची डागडुजी झाली आहे मात्र काही ठिकाणी अजून हे काम सुरू आहेत. पावसाळ्याआधी म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सर्व कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. असेही यावेळेस महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.
काम उत्कृष्टच होईल
माजी महापौर भारती सोनवणे यांच्या काळात रस्त्यांच्या डागडुजीची काम करण्यात आली होती. मात्र त्यातील काही रस्त्यांवर जर पुन्हा खड्डे पडले असतील तर त्या रस्त्यांची देखील डागडुजी करण्यात येईल. याच बरोबर रस्त्यांची डागडुजी ही उत्कृष्ट दर्जाची असेल यासाठी विशेष समिती नेमण्यात आल्या असल्याचेही यावेळी जयश्री महाजन यांनी सांगितले.