बेपत्ता नातीच्या भेटीनंतर आजी-आजोबांच्या डोळ्यातून तरळले अश्रू

यावलमधून दिड वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा ताबा अखेर पालकांकडे

यावल : शहरातील धोबीवाडा परीसरातील 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी सुमारे दीड वर्षापूर्वी शाळेतून बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती. गत आठवड्यात तिचे अपहरण उतरप्रदेशच्या एका व्याक्तीने केल्याची नंतर फिर्याद त्या मुलीच्या आजोबांनी केल्यांनतर यावल पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशात गेले होते. अल्पवयीन शोध घेतल्यानंतर तिला यावलला आणल्यानंतर तिचा पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

कानपूरातून घेतला ट्विंकलचा ताबा
ट्विंकल किरण कोळी (12) ही अल्पवयीन मुलगी आईचे वडील आजोबा भीमसिंग गंगाराम कोळी (धोबीवाडा, यावल) यांच्याकडे वास्तव्यास राहून शिक्षण घेत असताना 19 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास तिला शाळेच्या परीसरातून अज्ञात व्यक्तीने रीक्षात बसवून पळवून नेले होते. याबाबत ट्विंटल कोळीचे आजोबा भीमसिंग कोळी यांनी आपली नात व तिची आई मनीषा ही सुप्रीम कॉलनीतील जळगाव येथे राहत असल्याने सर्वप्रथम त्यांनी आपल्या मुलीकडे जाऊन नातीचा शोध घेतला मात्र त्याठिकाणी त्यांची नात व मुलगी मिळून आल्या नाहीत. त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे देखील ट्विंकल आणि त्याची आई मनिषा त्या दोघांचा शोध घेतला मात्र तरीदेखील ते मिळून आले नाहीत. अखेर भीमसिंग कोळी यांनी आपली नात ही बेपत्ता झाल्याची खबर पोलिसात दाखल केली होती. दीड वर्षानंतर 24 एप्रिल रोजी पहाटे चार वाजता सुमारास अचानक ट्विंकलचा फोन आला आणि आपण देरवा चौक, बडहलगंज, गोरखपूर, जि.उत्तरप्रदेश येथे सरकारी दवाखान्याच्या मागे राहत असल्याची माहिती दिली व आपली आई नवीनसिंग उर्फ गुड्डन रामा शंकरसिंग सोबत राहत असल्याचे व संंबंधीताने आपल्याला उत्तरप्रदेशात पळवून आणल्याचे माहिती दिल्याने पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशात गेले होते मात्र सुमारे एक महिन्यांपूर्वी कानपूरात ट्विंटलची आई मनीषा कोळीचे कोरोनाने निधन झाल्याने पोलिसांचे पथक ट्विंकलला घेवून परतल्यानंतर सोमवारी पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

अन आजोबांच्या डोळ्यातून पाणावले अश्रू
यावलचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सहा.फौजदार विजय पाचपोळे या दोन अधिकार्‍यांचे पथक स्थापन करून उत्तरप्रदेशात पाठवण्यात आले होते. बडहलगंज पोलिसांच्या सहकार्याने देरवा चौक या गावात पोलिसांचे पथक पोहोचले व अल्पवयीन ट्विंकलची ओळख तिच्या आजोबांनी आवाज देवून पटवल्यानंतर ती आजोंबाजवळ धावत आली. कायदेशीर पूर्तता करून पथक यावलमध्ये पोहोचले व सोमवारी ट्विंकल कोळी यांच्या कुटुंबातील इतर मंडळीशी संपर्क साधून तिला आजोबासह कुटुंबाच्या स्वाधीन केले. आपली नात ताब्यात मिळताच आनंदाने त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले. या सर्व तपासकार्यासाठी यावल येथील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच या शोधकार्यासाठी गेलेले पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आभार मानून विशेष कौतुक केले.