18 हजारांच्या लाचेचा मोह नडला : दोंडाईचातील लाचखोर हवालदार एसीबीच्या जाळ्यात

दोंडाईचा : तक्रारदारासह त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या संदर्भात न्यायालयात दोषारोपपत्र ब वर्गात (बी समरी) पाठवण्यासाठी 18 हजारांची लाच मागणार्‍या दोंडाईचा पोलिस ठाण्यातील हवालदार विजय शंकरराव मोरे (वय 50) नाशिक एसीबीच्या पथकाने मंगळवार, 25 रोजी रात्री उशिरा लाच स्वीकारताच अटक केली होती. बुधवारी आरोपी हवालदाराला धुळे सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिस ठाण्यामागेच स्वीकारली होती लाच
दोंडाईचा येथील 19 वर्षीय तक्रारदारासह त्याच्या नातेवाईकांविरोधात दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे व या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात ब वर्गात (बी समरी) पाठवण्यात पाठवण्यासाठी आरोपी हवालदार विजय मोरे यांनी 25 रोजी 20 हजारांची लाच मागितली होती मात्र तक्रारदाराने 18 हजार देण्याचे मान्य केले तसेच तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली पथकाने सापळा रचला. पोलिस ठाण्यामागील रीकाम्या पोलिस क्वार्टरमध्ये लाच स्वीकारताच हवालदाराला अटक करण्यात आली व त्याच्याविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला हवालदाराला एक दिवसांची पोलिस कोठडी
नाशिक एसीबीने सापळा यशस्वी केल्यानंतर आरोपीचा ताबा धुळे एसीबीकडे दिला व बुधवारी दुपारी आरोपी हवालदाराला धुळे सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास धुळे एसीबीचे उपअधीक्षक सुनील कुराडे करीत आहेत.

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलिस उपअधीक्षक (वाचक) पोलीस उपअधीक्षक विजय जाधव (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, हवालदार सचिन गोसावी, हवालदार दीपक कुशारे, नाईक एकनाथ बाविस्कर, नाईक प्रकाश डोंगरे, चालक जाधव आदींनी यशस्वी केला.

लाच मागितल्यास साधावा संपर्क
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, नाशिकच्या टोल फ्रि क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.