फैजपूरात कत्तलीसाठी कोंबलेल्या 34 गुरांचा मृत्यू : पाच जणांविरुद्ध गुन्हा

फैजपूर : फैजपूरात कत्तलीसाठी कोंबलेल्या 34 गुरांचा मृत्यू ः पाच जणांविरुद्ध गुन्हा कत्तलीसाठी फैजपूर येथे आलेल्या एका मोठ्या कंटेनर मध्ये कोंबून आणलेल्या 34 गुरांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा बाराच्या दरम्यान उघडकीस आली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात कंटेनर चालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दहा लाखांचा कंटेनर व सहा लाख 72 हजारांचे मृत अवस्थेतील गुरे जप्त केली तसेच मृत गुरांचे शवविच्छेदन करून जळगावच्या बाफना गोशाळेच्या आवारात त्यांचा दफनविधी करण्यात आला.

गुरांचा मृत्यू अन् पोलिसांची धाव
कंटेनर (क्रमांक यू.पी.21 बी.एन.3071) कोणताही परवाना नसतांना कत्तलीच्या उद्देशाने 32 बैलांसह दोन गायींना बुधवारी रात्री 12.15 वाजेच्या सुमारास फैजपूर येथील खिरोदा रोडवरील फिल्टर हाऊच्या समोरील मोकळ्या जागेत बांधून आणलेले उतरवण्यात आले मात्र अत्यंत निदर्यतेने गुरांची वाहतूक करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. याबाबतची गोपनीय माहिती सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे, उपनिरीक्षक शेख मसूद व कॉन्स्टेबल उमेश चौधरी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर ताब्यात घेत मृत गुरांचा पंचनामा केला. डॉक्टरांना पाचारण करण्यात आल्यानंतर शवविच्छेदन केले व मृत गुरांचा जळगावच्या बाफना गो शाळेच्या आवारात दफन विधी करण्यात आला.

पाच जणांविरुद्ध गुन्हा
गुरांची बेकायदा वाहतूक व मृत्यू प्रकरणी कॉन्स्टेबल उमेश चौधरी यांनी फिर्याद दिल्यावरून कंटेनर चालक मुनने खान प्यारेलाल (इस्लाम नगर उत्तर प्रदेश), सलीम शब्बीर तडवी, शेख साजीद शेख सगीर खाटीक (दोघे रा.फैजपूर), शेख कालू शेख यासीन (वरणगाव), शेख बिलाल शेख अय्युब (सावदा) या पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कंटेनर सह चालकास ताब्यात घेतले. तपास सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे, उपनिरीक्षक उमेश चौधरी करीत आहे.