भुसावळात छेडखानीवरून दोन गट भिडले ; 14 जणांविरुद्ध गुन्हा
पहिल्या गटाचे पाच तर दुसर्या गटाचा एक जण जखमी : पोलिसांकडून आरोपींचा शोध
चाकूसह तलवारीने हल्ला : पहिल्या गटातील पाच जण जखमी
पहिल्या गटातर्फे शेख इम्राम शेख रहिम (32, जाम मोहल्ला, मच्छीवाडा, भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी तेेहरीन शेख, तोफीफ शेख, उबेद शेख, आकिब शेख, जशीन शेख, फरीद मच्छिवाला यांची दोन मुले, सलमान (पूर्ण नाव नाही, सर्व रा. जाम मोहल्ला, मच्छीवाडा, भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीचा आशय असा की, संशयीत आरोपींना फिर्यादीसह त्यांच्या घरातील लोक आरोपींच्या घरातील महिलांची छेड काढतात, असा समज झाल्याने आरोपींनी फिर्यादीस लोखंडी रॉड व चाकू डाव्या हातावर मारून जखमी करण्यात आले तसेच फिर्यादीचा भाऊ रीजवान यासदेखील मारहाण करून जखमी करण्यात आले व फिर्यादीचा भाऊ बिसमिल्ला यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तेहरीन शेखने तलवार मारल्याने ती डाव्या हाताच्या मनगटाला ईजा झाली तसेच ईरफान शेख यास मारहाण करण्यात आली व रहिम शेख यांच्या डोक्यावर रॉड मारून जखमी करण्यात आले व घरातील साहित्याची तोडफोड करून महिलांना मारहाण करण्यात आली.
दुसर्या गटातील एक जखमी : सात जणांविरुद्ध गुन्हा
दुसर्या गटानेही या प्रकरणी फिर्याद दिल्यावरून पहिल्या गटाच्या सात जणांविरुद्ध भादंवि 324 व दंगलीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तेहरीन नासीर शेख (25, जाम मोहल्ला, मच्छीवाडा, भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यावरून रीजवान शेख उर्फ टिल्लू, शेख इमाम शेख गफूर, शेख तौहीफ शेख इमाम, शेख बिसमिल्ला शेख रहिम, गुड्डू (चुरण विकणारा), शेख ईरफान शेख रहिम, शेख इम्रान शेख रहिम (सर्व रा.जाम मोहल्ला, मच्छीवाडा, भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराच्या 30 वर्षीय मावशीची संशयीत आरोपी रीजवान शेख उर्फ टिल्लू याने छेड काढल्यानंतर त्यास जाब विचारल्याचा राग आल्याने आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच संशयीत आरोपी शेख इरफान शेख रहिमने फिर्यादी तेहरीन नासीर शेख यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याने त्यांना जबर जखम झाली व उजव्या पायाला मुका मार लागला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.