गोपाळपुरा भागातील बालकांच्या शोधासाठी दोन पथके तैनात

जळगाव – शहरातील गोपाळपुरा भागात ओळखीचा गैरफायदा घेत परिचयातील व्यक्तीने दोन बालकांचे
अपहरण केले असून या बालकांच्या शोधासाठी शनिपेठ पोलिसांनी दोन पथके तैनात केले आहे. हे पथक
अपहरण करणारा व्यक्ती व त्या बालकांचा शोध चोपडासह नशिराबाद, कुसुंबा आदी भागात घेत आहे.
मूळचे शेलजा (ता. भिकनगाव, जि. खरगोन, मध्यप्रदेश) येथील मूळचे रहिवासी चव्हाण कुटुंब गोपाळपुरा
भागात वास्तव्यास आहेत. याच परिसरात राजू दत्तू चव्हाण हे त्यांची पत्नी राणी चव्हाण व मुले काजल, नंदिनी
आणि प्रवीण राहतात. तेे शेतमजुरी व मिळेल ते काम करुन उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घरी 27 मे रोजी
दुपारी त्यांच्या परिचयातील सुनील बारेला नामक व्यक्ती आला होता. यानंतर तो चिकन घेण्याच्या बहाण्याने क
ाजल राजू चव्हाण (वय 10) आणि मयूर रवींद्र बुनकर (वय 9) या दोघं बालकांना घेऊन गेला. बराच वेळ
झाला तरी बारेला व दोघ बालकं घरी न आल्यामुळे राणी चव्हाण यांनी चिकनच्या दुकानदाराकडे चौकशी केली.
परंतु, बारेलासह ते बालक चिकण दुकानाकडे आलेच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राणी चव्हाण यांच्यासह परिसरामधील नागरिकांनी बालकांचा शोध घेतला. मात्र, ते बालक आढळले नाही. यानंतर चव्हाण कुटुंबाने सुनील बारेला याच्या मूळ गावी तपास घेतला असता तो कधीपासूनच गाव सोडून गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राणी चव्हाण यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सुनील पडत्या बारेला (रा. चिरमलीया, ता. वारला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) याच्या विरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.