फडणवीस म्हणाले ; सरसकट द्यावी भरपाई ; नाकर्तेपणा लपवण्यासाठी राज्याचे केंद्राकडे बोट
विरोधी पक्ष नेत्यांच्या दौर्यात शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न : शेतातील नुकसानीची पाहणी न केल्याने मेळसांगवेतील शेतकरी संतप्त
भुसावळ/रावेर : केळी पट्ट्यात वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेकडो हेक्टरवरील केळी आडवी झाल्यानंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जिल्हा दौर्यावर आले होते. मुक्ताईनगरसह रावेर तालुक्यातील केळी बांधावर थेट फडवणीस यांनी जावून शेतकर्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणल्या. राज्य शासनाने पंचनाम्यांऐवजी थेट शेतकर्यांना भरपाई द्यावी, असे त्यांनी सांगत आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी राज्य शासन केंद्राकडे बोट दाखवत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या दौर्यात खरी खळबळ मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवेतील योगेश पाटील या शेतकर्याने उडवली. बांधावर नुकसान झाले असतानाही फडवणीस यांनी भेट न दिल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तो रोखला तर मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात शिवसेना पदाधिकार्यांनी ताफा रोखत केंद्राने पीक विमा योजनेतील निकष पूर्वीप्रमाणेच ठेवण्याची मागणी करण्यात आली.
मुक्ताईनगर तालुक्यात बांधावरच पाहणी
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा, शेमळदे, नायगाव, मेंढोदे, पिंप्रीनांदू आदी परीसरात झालेल्या नुकसानीची मंगळवारी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली. सकाळी 9.45 चा वेळ असताना फडणवीसांचा ताफा मुक्ताईनगरात दोन तास उशिराने 11 वाजता पोहोचला. पाहणीप्रसंगी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी फडणवीसांना खडे बोल सुनावत आता व तेव्हा भाजपची सत्ता असतानाही भाजप सरकारने केळी उत्पादक शेतकर्यांना मदत केली नसल्याचा आरोप केला. केवळ हेक्टरी 13 हजार रुपये अनुदान देण्यात आले तर शेजारच्या मध्यप्रदेशातील भाजप सरकारने हेक्टरी एक लाख रुपये भरपाई दिल्याचे शेतकरी म्हणाले.
दौरा केवळ फोटो सेशनसाठी
मेळसांगवे येथील योगेश पाटील या शेतकर्याच्या शेतात फडणवीस यांनी भेट न दिल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र तो रोखण्यात आला. माझ्या शेतापर्यंत या, पाहणी करा, नाहीतर मी आत्महत्या करेन, असा सूर योगेशन आवळला मात्र तोपर्यंत ताफा निघून गेला. दरम्यान, शेतकर्याच्या हातात रीकामी बाटली होती त्यामध्ये कुठलेही द्रव अथवा विषारी पदार्थ नव्हता, असे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार म्हणाले.
यांचा होता दौर्यात समावेश
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पाहणी दौर्यात माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार चंदूलाल पटेल, भुसावळचे आमदार संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर आदींसह भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
रावेर तालुक्यातही केली पाहणी
फडणवीस यांनी रावेर तालुक्यातील विटवा, ऐनपूर, कळमोदा, धामोडी, वाघाडी, खिर्डी, तांदलवाडी परीसरात पाहणी करीत शेतकर्यांच्या समस्या जाणल्या.
कोरोना आटोपताच सत्तांतराकडे लक्ष देणार
रावेर तालुक्याच्या दौर्यात फडणवीस म्हणाले की, कोरोना आटोपताच सत्तांतराकडे लक्ष देणार असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ज्येष्ठ नेते असून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो त्यामुळे त्याला राजकीय वळन देऊ नका, असे त्यांनी सांगितले. भाजपा मराठा आरक्षण मिळण्याच्या बाजूने सरकारसोबत आहे.संभाजीराजेंनी राजकारण करू नये अन्यथा जस्यास-तसे उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.