जळगाव पोलिसांची मोटारसायकल चोरांवर मोठी कारवाई

जळगाव । तालुक्यातील म्हसावद येथून 30 हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरणार्‍या संशयित
आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याच्याकडून इतर गुन्ह्यांची माहिती उघड होण्याची दाट शक्यता आहे. याच बरोबर शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीप्रकरणी तांबापूरमधील दोन संशयिताना सोमवारी सकाळी 6 वाजता राहत्या घरातून अटक केली. त्यांच्याकडून पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
शक्तिसिंग खेतसिंग शेखावत (वय 32, रा. गोरीया ता. दातारामगढ, जि. शिकर,राजस्थान, ह.मु. रामेदववाडी
ता.जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शांताराम मिठाराम बागुल (वय 48, रा.वाकडी, जि.जळगाव) हे मोटारसायकल (क्र.एमएच 19 डीएच 7613)ने 5 जून रोजी सायंकाळी म्हसावद येथे गेले होते. त्यांची मोटारसायकल चोरट्याने लांबवली होती. याबाबत शांताराम बागुल यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर तपासाधिकार्‍यांनी शक्तिसिंग खेतसिंग शेखावत (वय 32, रा. गोरीया, ता. दातारामगढ, जि. शिकर, राजस्थान, ह.मु. रामेदववाडी, ता.जळगाव) याला म्हसावद येथून मोटारसायकलसह अटक केली. त्याच्याकडून मोटारसायकल हस्तगत केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, मिलिंद सोनवणे, गणेश शिरसाळे, शशिकांत पाटील, स्वप्निल पाटील, योगेश बारी यांनी केली.

तर सुरेश यशवंत देशपांडे (वय 25, रा. महाबळ रोड, संभाजीनगर) हे 11 मे रोजी सकाळी 7 वाजता लस घेण्यासाठी छत्रपती शाहू महाराज लसीकरण केंद्रावर मोटारसायकल (क्र.एमएच 19 एझेड 9087) ने गेले होते. त्यांनी लसीकरण केंद्राच्या बाहेर मोटारसायकल पार्कींगला लावली. मात्र, ही मोटारसायकल चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी सुरेश देशपांडे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी कॉन्स्टेबल अक्रम शेख यांना संशयित आरोपीबाबत गुप्त माहिती मिळाली. कारवाईसाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाने कॉन्स्टेबल अक्रम शेख, भास्कर ठाकरे, तेजस मराठे, योगेश इंधाटे, प्रणेश ठाकूर, हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ, रतन गिते, कि शोर निकुंभ, उमेश भांडारकर यांचे पथक तयार झाले. या पथकाने तांबापूरमधील शाहरुख जहूर खाटीक (वय 25) व फारुख शेख मुस्तफा (वय 32, रा. राजा कॉलनी) यांना सोमवारी सकाळी 6 वाजता राहत्या घरातून अटक केली. आरोपींनी रावेर तालुक्यातून पाच मोटारसायकली काढून दिल्या. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.