आसोदा येथील तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव । आसोदा येथील चायनीज पदार्थ विक्रेत्या तरुणाने धावत्या रेल्वेखाली शुक्रवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
आसोदा येथील वाल्मीकनगरातील समाधान मूलचंद कोळी (वय 28) हा तरुण गावातच चायनीज पदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत होता. तो शुक्रवारी सकाळी 5.45 वाजेच्या सुमारास शौचास जाऊन येतो, असे सांगून घरात बाहेर निघाला. त्याने आसोदा रेल्वे गेटपासून एक कि.मी. अंतरावरील रेल्वे खंबा क्रमांक 423/1 डाऊन लाइनने येणार्‍या धावत्या रेल्वेखाली केली. याबाबत कळताच तालुका पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल साहेबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाजवळील रस्त्यांच्या बाजूला पडलेली मोटारसायकल व खिश्यातील कागदपत्राच्या आधारे ओळख पटली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.