रावेर येथील लाचखोर लिपिकास अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई

रावेर येथील लाचखोर लिपिकास अटक
जळगाव- सेवानिवृत्त कर्मचार्‍याच्या ग्रॅज्युएटीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपये व अर्जित रजेची येणारी रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी 500 रुपये अशी एकूण 2500 रुपयांची लाच मागणी करणार्‍या रावेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी अटक केली.
याबाबत रावेर येथील एका 24 वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्याचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागातून वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्याच्या वडिलांच्या ग्रॅज्युएटीचे तीन लाख 91 हजार 710 रुपये रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपये आणि अर्जीत रजेची येणारी रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी 500 रुपये असे एकूण 2500 रुपये लाचेची मागणी रावेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिक शेख वसीम शेख फयाज (वय 30, रा.मदिना कॉलनी, रावेर) याने पंचासमक्ष तक्रारदाराकडे रविवारी केली होती. परंतु, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची काही कारवाई होते की काय? याबाबत शंका आल्याने तो लिपिक सावध झाला. परंतु, लाच मागितल्याच्या कारणावरुन लिपिक शेख वसीम शेख फयाज याच्या विरुद्ध गुरुवारी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक करण्यात आली आहे.