कोरोनावरून योगींबद्दल असं म्हणाले नरेंद्र मोदी

वाराणसी : आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाची उधळण केली. करोना काळात योगी सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदींनी योगींच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

पंतप्रधान मोदी यांनी कोरोना नियंत्रणाबद्दल योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठीचे उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. काशीतील माझ्या सहकाऱ्यांचे, शासन- प्रशासनाचे, कोरोना योद्ध्यांच्या संपूर्ण गटाचे विशेष आभार मानतो. तुम्ही ज्याप्रमाणे दिवस-रात्र झटून व्यवस्था निर्माण केली आहे, ही खूप मोठी सेवा आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक संकटे आली. कोरोना विषाणूच्या बदलणाऱ्या आणि अधिक घातक रुपाने संपूर्ण ताकदीने आपल्यावर हल्ला चढवला. मात्र, काशीसह संपूर्ण उत्तर प्रदेशने या संकटाशी खंबीरपणे लढा दिला, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

देशात करोनाकाळात सर्वाधिक चाचण्या करणारं उत्तर प्रदेश हे सर्वात वरच्या क्रमांकाचं राज्य ठरल्याचा उल्लेखही यावेळी पंतप्रधानांनी आवर्जुन केला. आज उत्तर प्रदेश हे संपूर्ण देशात सर्वाधिक लसीकरण करणारं राज्यही बनलंय. मी बऱ्याच वेळेपासून काशी आणि उत्तर प्रदेशच्या विकासकामांचा उल्लेख करतोय, पण ही यादी इतकी मोठी आहे की लवकरच संपणार नाही. जेव्हा वेळ कमी असतो तेव्हा विचार करावा लागतो की उत्तर प्रदेशातील कोणकोणत्या विकासकामांची चर्चा करू आणि कोणकोणत्या विकासकामांचा उल्लेख टाळू. उत्तर प्रदेश हे राज्य देशातील आघाडीचं गुंतवणूक स्थळ म्हणून समोर येतंय. काही वर्षांपूर्वपर्यंत ज्या उत्तर प्रदेशात व्यापार-धंदा करणं अवघड समजलं जात होतं तीच जागा आज ‘मेक इन इंडिया’साठी सर्वाधिक पसंतीची जागा बनत आहे, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. आज उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलंय.