ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू न झाल्याचा दावा खोडून काढणारा गडकरींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू न झाल्याचा सरकारचा दावा खोडून काढणारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नितीन गडकरी असे म्हणतात की, ‘”कोविडच्या या काळात आपल्या देशातील अनेक लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपला जीव गमवावा लागला.

करोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाले नसल्याची माहिती केंद्राने अधिवेशनादरम्यान सभागृहात दिली. त्यामुळे राजकीय गोंधळ उडाला आहे. करोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यात ऑक्सिजनचा अभाव असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत होत्या. मात्र, सरकारने हे वृत्त फेटाळले आहे. त्यामुळे सरकारच्या विधानावर लोक सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करीत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेसस नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू न झाल्याच्या केंद्र सरकारच्या दाव्यावरुन हल्लाबोल केला आहे.