ठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

जळगाव । राज्यातील आघाडीचे ठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार दिसत आहे. या सरकारने मुंबई पुरतेच मर्यादित न राहता, राज्यव्यापी होऊन ग्रामीण भागातील तळगाळामधील जनतेसाठी काम करावे. पण, या कार्यात ठाकरे सरकार कमी पडत असल्याचा आरोप माजी मंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
माजी मंत्री बावनकुळे जिल्हा दौर्‍यावर आले असताना ते शुक्रवारी सकाळी भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्यासोबत माजी मंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त मुंबई, तर उपमुख्यमंत्री अजित पवार केवळ पुण्यापुरतेच मर्यादित दिसत आहे. राज्य सरकारचे कामकाज, ध्येयधोरण, शासकीय योजनांचा लाभ महाराष्ट्रातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ग्रामविकासाचे वाटोळे होत आहे. भाजपा सरकारने राज्य लोडशेडिंगमुक्त केले होते. परंतु, आता राज्य लोडशेडिंगकडे जात आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार, उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे कोणाचेही वीज कनेक्शन कापता कामा नये. ईडीच्या कारवाईत काही तरी तथ्य असेल, म्हणूनच कारवाई होत आहे. उगीच कारवाई कशाला होईल. चुकीचे आरोप करण्यापेक्षा थेट चौकशी होऊ द्या. जे काय तथ्य असेल, ते जनतेसमोर येईल, असा टोला बावनकुळे यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता लगावला. भाजपाने ओबीसी नेत्यांवर अन्याय केल्याचा आरोप खोटा आहे. भाजपा सरकारमध्ये सर्वाधिक मंत्री ओबीसी समाजातील होते, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात कमी पडत आहे.