अज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी

दूरदर्शन टॉवरजवळील महामार्गावरील घटना

जळगाव । अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील भुसावळ येथील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दूरदर्शन टॉवरजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. यात प्रकाश श्यामराव जोशी (वय 46, रा. भुसावळ) हे ठार झाले असून त्याची मुलगी आदिती ही गंभीर जखमी झाली आहे.
प्रकाश श्यामराव जोशी (वय 46, रा. कोळी मंगल कार्यालयाजवळ, सुखकर्ता बिल्डींग, रा. भुसावळ) हे जळगावातील जळगाव जनता बँकेत कार्मिक विभागात नोकरीला होते. ते बँकेच्या कामानिमित्त व जळगाव शहरातील पिंप्राळा येथील भाचा सीए अतुल श्रीकांत पाठक यांना भेटण्यासाठी त्यांची कन्या आदिती (वय-18) सह भुसावळहून जळगावकडे मोटारसायकलने येत होते. तसेच त्याची पत्नी नूतन, कन्या रेवती व आकांक्षा हे भुसावळहून जळगावला येण्यासाठी रेल्वेने निघाले होते. तर प्रकाश जोशी व त्यांची तीन नंबरची मुलगी आदिती हे भुसावळहून जळगावला येण्यासाठी रविवार सकाळी मोटारसायकल (क्र.एमएच 19 डीएम 9071) ने निघाले होते. मात्र, त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने दूरदर्शन टॉवर जवळील महामार्गावर जोरदार धडक दिली. यात प्रकाश जोशी हे ठार झाले. तर त्यांची कन्या आदिती जोशी ही गंभीर जखमी झाले आहे. या घटनेबाबत महामार्गावरील काही जणांनी 108 क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्सला कळविले. काही वेळात अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचली. दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले असता पिता ठार, तर कन्या गंभीर जखमी असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. मुलीला खासगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. प्रकाश जोशी यांचे शवविच्छेदन करुन मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत प्रकाश जोशी यांच्या पश्चात पत्नी नूतन, मुलगी रेवती, आकांक्षा व आदिती अशा तीन मुली, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. अ‍ॅम्ब्युलन्समधील कर्मचार्‍यांनी प्रकाश जोशी यांच्या मोबाइलमधील त्यांचा भाचा सीए अतुल श्रीकांत पाठक यांच्या नंबरवर संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. पाठक यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनावरील चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व नाईक नितीन पाटील करीत आहेत.