जळगाव : शहरातील मोहाडी रोडवरील दौलत नगरात तोंडाला मास्क बांधून आलेल्या दरोडेखोरांनी कुटुंबियांना शस्त्राचा धाक दाखवत दरोडा टाकून सुमारे 18 लाख पाच हजारांचा मुद्देमाल लांबवला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत बारकाईने या गुन्ह्याची उकल करीत दरोड्यातील संशयीत किशोरसिंग उर्फ टकल्या रामसिंग टाक (रा. गुरुगोविंदसिंग नगर, जालना) व रणजितसिंग जीवनसिंग जुनी (रा.राजीव गांधी नगर, जळगाव) यांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरोड्यातील पसार आरोपींचा कसून शोध
दौलत नगरातील दरोड्यात करधसिंग (रा.परभणी), तेजासिंग नरसिंग बावरी, ज्वालासिंग रामसिंग कलाणी व किशोरसिंग रामसिंग टाक (तिघे रा.जालना) हे संशयित निष्पन्न करण्यात आले होते. त्यापैकी किशोरसिंगला पोलिसांनी अटक केली असून इतर संशयीतत पसार आहेत. त्यांचा कसून पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.