218 व्यापारी गाळे लिलाव पद्धतीने वितरित करा

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेचे शहरातील विविध ठिकाणी असलेले 218 व्यापारी गाळे वापराशिवाय धूळखात पडून आहेत. गाळे पडून असल्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. व्यापारी गाळ्याच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसेल तर, जाहीर लिलाव करून हे गाळे वितरीत करावेत, अशा सूचना महापौर नितीन काळजे यांनी प्रशासनाला केल्या आहेत. तसेच, महापालिकेकडे पडून असलेल्या सर्व भंगाराची विक्री करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त दालनात भूमी जिंदगी विभागाची आढावा बैठक झाली. सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक लक्ष्मण उंडे, तुषार कामठे, आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य निरीक्षक विजय खोराटे आदी बैठकीला उपस्थित होते.

कोट्यवधी रुपयांचा खर्च
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून गाळे बांधले आहेत. शहरातील विविध ठिकाणी 218 व्यापारी गाळे धूळखात पडून आहेत. गाळे का बंद आहेत, स्थापत्य विभागाने भूमी जिंदगी विभागाकडे गाळे का दिले नाहीत, याची सर्व माहिती मागविण्यात आली आहे. निविदेला प्रतिसाद मिळत नसेल तर जाहीर लिलाव करून गाळे वितरीत करण्यात येणार आहेत. प्रभाग कार्यालयात, तसेच विविध कार्यालयात मोठ्या प्रमाणात भंगार पडून आहे. त्या भंगाराची विक्री करण्याच्या सूचनाही महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

पिंपरी मंडई स्वच्छ करा
पिंपरी मार्केटचादेखील आढावा घेण्यात आला. पिंपरी, भाजी मार्केटमधील गाळे पडून आहेत. फुलांचा व्यापार करणार्‍यांना बसण्यासाठी गाळे नाहीत. मंडईत घाणीचे साम्राज्य आहे. ही घाण साफ करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना बैठकीत देण्यात आले. दोन ऑगस्ट रोजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत भाजी मंडई परिसराची पाहणी करुन समस्या जाणून घेण्यात येणार आहेत, असेही महापौर काळजे यांनी सांगितले.