भुसावळ : भुसावळातील 19 वर्षीय युवकाचा तापी नदीत बुडाल्याने मृत्यू झाला. शुक्रवार, 24 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अजय राजू वानखेडे (19, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पाय घसरल्याने बुडाल्याने मृत्यू
मुस्लीम कॉलनीतील रहिवासी असलेल्या अजय राजू वानखेडे (19) या तरुणाचा मित्र रोहितच्या आजीचे निधन झाल्याने त्याने कामावरील मालकास कामावर येत नसल्याचे कळवले तर अजयच्या कुटूंबियांनी त्यास पाण्यात न जाण्याचे बजावले होते. तापी नदीकाठावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर तरुणाचे मित्र गोलू व गल्लू यांच्यासह अजय हा स्मशानभूमीपासून लहान पूलाकडे हातपाय धुण्यासाठी गेले मात्र अजय याने मित्रांचे न ऐकता लहान पूल गाठला व त्याचवेळी पाय घसरून पाण्यात पडला. मित्रांना पोहता येत नसल्याने त्यांनी आरडाओरड केली व काही जण धावून आले मात्र पाण्यात अजयचा शोध लागला नाही. नगरसेवक निर्मल कोठारी यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी काही पट्टीच्या पोहणार्या युवकांना नदीवर पाठविले.
दुपारी सापडला मृतदेह
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकास शहर पोलिसांनी पाचारण केल्यावर शुक्रवारी दुपारी एक वाजेपासून अजयचा नदीत शोध सुरू करण्यात आल्यानंतर दुपारी साडेचार वाजता मृतदेह सापडला. शहरचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहा.पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, महेंद्र ठाकरे, संजय सोनवणे, विकास बाविस्कर, मोहंमद वली सैय्यद, समाधान पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. शहर पोलिसात मयताचा भाऊ जय वानखेडे याने खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.