यावल : तालुक्यातील शिरागड येथील श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरातील तीन दान पेट्या अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या बाहेर काढून फोडल्या. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पोलिसांनी पाचारण केल्यानंतर श्वानाने मानकी नाल्यापर्यंतचा माग दाखवला. अज्ञात चोरट्यांनी या भागातील एका हॉटेलमध्येही चोरी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
दानपेट्या फोडल्याने भाविकांमध्ये उडाली खळबळ
शिरागड येथे ‘लहान गड’ म्हणून सप्तशृंगी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराचे अध्यक्ष शांताराम सोळुंके यांनी चोरी प्रकरणी यावल पोलिसात फिर्याद दिली. ते मंदिराच्या खोलीत झोपले असताना चोरट्यांनी दानपेट्या लांबवल्या. याबाबतची माहिती लगेच पोलिस पाटील सुधाकर सोळुंखे, सरपंच योगीता सोनवणे यांना कळवण्यात आल्या. दानपेट्या मानकी नाल्याजवळ फेकल्याचे दिसले. यावल पोलिसांना माहिती देताच पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहायक फौजदार अजीज शेख, हवालदार संजय देवरे, ज्ञानेश्वर कोळी यांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, शिरागडपासून थोड्या अंतरावर असलेल्या लावण्य हॉटेलच्या गल्ल्यातील सुमारे तीन हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली.