भुसावळात चाकूचा धाक दाखवून कंत्राटदाराकडे मागितली 15 लाखांची खंडणी
तिघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल : शहरात गुन्हेगारी बोकाळली
भुसावळ : चाकूचा धाक दाखवून शासकीय कंत्रादाराला 15 लाखांची खंडणी मागत शिविगाळ करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील नवशक्ती आर्केड कॉम्प्लेक्समध्ये 25 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता घडली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
खंडणी मागत केली मारहाण
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शासकीय कंत्राटदार असलेले योगेश अशोक नरोटे (29, रा.गुलमोहर कॉलनी, भुसावळ) हे नवशक्ती आर्केड कॉम्प्लेक्समधील गाळा क्रमांक पाच व सहामध्ये वडील अशोक रामभाऊ नरोटे व प्रमोद नाना पाटील यांच्यासोबत बसलेले असताना 25 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी दीपक भास्कर राणे, पवन मेहरा (पूर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी व्यक्ती असे तिघे कार्यालयात दुपारी एक वाजेच्या सुमारास आले. तुला येथे रहायचे असेल तर मामा विनोद नामदेव सोनवणे (मुक्ताईनगर) याच्याकडून 15 लाख रुपये आणून दे अन्यथा तुझ्या मामा व मेहुण्याविरोधात खोट्या केसेस करून जेलमध्ये टाकेल, अशी धमकी संशयीतांनी दिली. तक्रारदार योगेश नरोटे यांनी संशयीतांना समजावण्याचा प्रयत्न केला असता शिविगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच प्रमोद पाटील यांना पाहून घेण्याची धमकीही देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी सुरूवातीला पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याची चौकशी होवून गुन्हा दाखल करण्यात आला.इबाजारपेठ पोलिसात योगेश अशोक नरोटे यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी दीपक भास्कर राणे, पवन मेहरा (पूर्ण नाव नाही) व अन्य एका अनोळखी संशयीतांविरोधात भादंवि 385, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.