गोर-गरीबांच्या घशातील स्वस्त धान्य ओरबाडणार्या रॅकेटचा उलगडा
30 टन तांदळाची वाहतूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा : दोघा आरोपींना अटक
यावल : यावल पोलिसांनी अलीकडेच ट्रकमधील तांदळाची संशयास्पद वाहतूक होताना कारवाई केली होती. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकार्यांना अभिप्राय मागण्यात आला तसेच तांदळाचे नमूनेदेखील घेण्यात येवून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यावल पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावत संशयीतांच्या गोदामाची पाहणी केल्यानंतर त्यात आढळलेल्या रीकाम्या गोण्यांवर शासनाचा आढळलेला सिम्बॉल तसेच उभयंतांकडे नसलेले स्टॉक रजिस्टर तसेच धान्य खरेदी-विक्रीचा कुठलाही परवाना नसल्याने जप्त तांदुळ हा रेशनचाच असल्याचे निष्कर्ष यावल पोलिसांनी काढला आहे. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. निलेश राजेंद्र जैन व संतोष प्रभाकर पाटील (कापडणे, ता.जि.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी आता या प्रकरणी काय अभिप्रय देतात? याकडेदेखील लक्ष लागले आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शासनाचा शिधापत्रिकेवर वितरीत होणारा तांदूळ काळ्याबाजारात चोपड्याहून गोंदिया येथे जास्त दराने विक्रीसाठी जात असल्याची माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई 23 रोजी दुपारी कारवाईचे निर्देश दिले होते. यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान समशेर खान, पोलीस हेड कॉन्स्टेबल असलम खान, चालक रोहिल गणेश, पोलीस कॉन्स्टेबल सुशील घुगे यांच्यासह अन्य पथकाने यावल-चोपडा रस्त्यावरील हॉटेल केसर बागजवळ ट्रक (क्रमांक एम.एच.18 ए.सी. 847) ची तपासणी केली असता त्यात पाच लाख 88 हजार रुपये किंमतीचा तांदुळ आढळला होता. यावेळी चालक केदार मुरलीधर गुरव (38, आकाश गार्डनसमोर, शिरपूर) यास ताब्यात घेण्यात आले होते. चालकाने चौकशी हा तांदुळ चोपडा येथील पंकज मुरलीधर वाणी यांनी सांगितल्यावरून संतोष पाटील व निलेश जैन (कापडणे, ता.जि.धुळे) यांच्या कापडणे-कवठळ रस्त्यावरील कल्याणी फिनाईल इंडस्ट्रीजच्या गोदामातून भरून हिरा ट्रान्सपोर्ट, चोपडामार्फत गीताका पॅराबोलीक इंडस्ट्रीज, गोंदिया येथे नेत असल्याची कबुली दिली होती.
170 टन तांदळाचा झाला काळाबाजार ?
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चोपड्याच्या पंकज वाणी यांच्याशी संतोष पाटील व निलेश जैन यांचा संबंध आल्यानंतर त्यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यात सुमारे तीन ट्रक (160 ते 170) तांदुळ पाठवण्यात आला व चालकामार्फत त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यावल पोलिसांनी कापडणे येथील कल्याणी फिनाईल इंण्डस्ट्रीज गोदामाची तपासणी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा रेशन धान्य विक्रीचा सिम्बॉल असलेले व महाराष्ट्र शासन व खरीप पणन हंगाम व धान्याचा प्रकार धान/तांदूळ प्रिंट केलेले 25 बारदान मिळून आले शिवाय उभयंतांकडे धान्य खरेदी-विक्री करण्याचा कोणताही परवाना नाही अथवा स्टॉक रजिस्टर आढळलेले नाही त्यामुळे जप्त तांदूळ हा शासनाचाच असल्याची पोलिसांची खात्री होवून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
यावल पोलिसा सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान समशेर खान यांच्या फिर्यादीनुसार, पंकज मुरलीधर वाणी (चोपडा), निलेश राजेंद्र जैन व संतोष प्रभाकर पाटील (कापडणे, ता.जि.धुळे) व ट्रक चालक केदार मुरलीधर गुरव (38, रा.आकाश गार्डन समोर, शहादा रोड, शिरपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.