फैजपूरात वीटभट्टी व्यावसायीकावर हल्ला : चौघा आरोपींना अटक

फैजपूर : शहरातील वीटभट्टी व्यवसायीक तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी फैजपूर पोलिसांच्या पथकाने चौघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. एक संशयीत फैजपूरातील तर दोघे कंडारी, ता.भुसावळ व एक संशयीत जळगावचा रहिवासी आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसात वीटभट्टी व्यावसायीक तरुण आकाश संतोष कापडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लखन एकनाथ मंडवाले (फैजपूर), गोपाळ मधुकर सुरळकर (जळगाव खुर्द) राकेश प्रकाश मोरे, आकाश रमेश मस्के (रा.कंडारी भुसावळ) यांना अटक करण्यात आल्याची माहिती सहा.निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी दिली.

वीटा घेण्याच्या बहाण्याने केला हल्ला
17 ऑक्टोंबर रोजी आकाश कापडे याला वीटा घेण्याच्या बहाण्याने बोलवत अज्ञात दोन आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता व रॉडचा वापर करीत मारहाण करीत गंभीर जखमी केले होते. आकाश यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या 20 दिवसांपासून पोलिसांचे पथक या अज्ञात आरोपींचा शोध घेत होते.

तांत्रीक माहितीच्या आधारे आरोपी जाळ्यात
या प्रकरणी पोलिसांनी बुलढाणा, मुक्ताईनगर, पहूर, शेंदुर्णी, भुसावळ, फैजपूर येथे चौकशी करून तांत्रिक माहितीच्या आधारे या आरोपींना शनिवारी सकाळी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. त्यामध्ये लखन मंडवाले यांच्याशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून आकाश याच्यावर जळगाव व कंडारी येथील आरोपींमार्फत हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली. आरोपी लखन एकनाथ मंडवाले, गोपाळ सुरळकर, राकेश मोरे, आकाश म्हस्के या आरोपींना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. एक आरोपी अज्ञात असून त्याचाही शोध घेतला जता आहे. सहा.पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, फौजदार मसलुउद्दीन शेख, पोलीस नाईक किरण चाटे, महेंद्र महाजन, उमेश चौधरी, योगेश महाजन, चेतन महाजन, व पोलीस अधीक्षक कार्यालयातील संदीप सावळे यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.