रावेर : कर्मचार्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी करीत रावेर आगाराच्या कर्मचार्यांनी काम बंद केल्याने सोमवारी आगारातून एकही बस बाहेर गेली नाही. बससेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाले मात्र याचा फायदा मध्यप्रदेशच्या खाजगी बस व रीक्षा चालकांनी घेतला. रीक्षा चालकांनी प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारणी केली. दिवाळीच्या काळात एसटी कर्मचार्यांनी संपाचे हत्यार उपसल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. रविवारपासून बस बंद असल्याने बस स्थानकावर आलेल्या प्रवाशांना माघारी फिरत अखेर खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. एस.टी.महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे तसेच एस.टी.महामंडळाच्या अन्यायस्पद धोरणामुळे एस.टी.कर्मचार्यांच्या दिवसेंदिवस आत्महत्या वाढत आहे. यामुळे शासन याची गांभीर्याने दखल घेण्यासाठी रविवारी दुपारी दोन वाजेपासून येथील आगारातील सर्व कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. या संपात सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. ऐन दिवळीच्या काळात प्रवाशांची गर्दी असताना एस.टी.कर्मचार्यांच्या बंदचा फटका असंख्य प्रवाशांना बसला. बस स्थानकाच्या प्रवेश द्वाराजवळ कर्मचार्यांनी यावेळी निदर्शने केली. आगारातील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने दुपारपासून एकही बस धावली नाही.