भुसावळ नगरपालिका प्रभारी नगराध्यक्षपदी सोनी बारसे
नगराध्यक्ष रमण भोळे सुटीवर : मेहतर वाल्मिकी समाजाला इतिहासात प्रथमच संधी
भुसावळ : भुसावळ नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच मेहतर वाल्मिकी समाजाच्या रूपाने सोनी संतोष बारसे यांना प्रभारी नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्याने समाजबांधवांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. भुसावळ पालिकेचे नगराध्यक्ष रमण देविदास भोळे हे कौटुंबिक कामानिमित्त गुरुवारपासून सुटीवर गेल्याने पुढील काही दिवसांपर्यंत बारसे यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार असणार आहे.
माजी मंत्री खडसेंचे घेतले आशीर्वाद
बुधवारी माजी नगरसेवक संतोष बारसे व उपनगराध्यक्ष सोनी संतोष बारसे यांनी खडसे फार्म हाऊसवर जावून माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी खडसे यांनी शहर विकासासाठी चांगले काम करा, असा आशीर्वाद बारसे दाम्पत्याला दिला. प्रसंगी भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऑगस्ट महिन्यात मिळाली उपनगराध्यक्ष पदाची संधी
मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 रोजी सोनी बारसे या उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या. ऑनलाईन सभेत सत्ताधारी गटाच्या 26 तर विरोधातील दोन नगरसेवकांच्या संमतीने बारसे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रीक्त झालेल्या या पदावर ही निवड त्यावेळी झाली होती. दरम्यान, यापूर्वी युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे यांना प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर आता बारसे यांना संधी मिळाली आहे.
पालिकेच्या इतिहासात प्रथमच संधी
सोनी बारसे यांच्या रूपाने मेहतर वाल्मिक समाजाला प्रथमच पालिकेच्या इतिहासात नगरपालिकेत उपनगराध्यक्ष व प्रभारी नगराध्यक्ष या रुपाने काम करण्याची संधी मिळाल्याने समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहर विकासाला चालना देण्यासह माजी मंत्री नाथाभाऊ व ज्येष्ठ-श्रेष्ठ लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासासाठी काम करणार असल्याची ग्वाही सोनी बारसे यांनी यावेळी दिली.