आजपासून ईटारसीसह बडनेरादरम्यान मेमू धावणार

वर्षभरानंतर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : ‘मेमू’ने प्रवास करताना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे

भुसावळ : कोरोनामुळे तब्बल वर्षभरापासून पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने आरक्षीत गाड्यांमधून प्रवाशांना अधिक तिकीटाची झळ सोसावी लागत होती मात्र सोमवार 15 नोव्हेंबरपासून भारतीय रेल्वे गाड्यांचा विशेष दर्जा काढण्याचा निर्णय झाल्याने आता सर्वसाधारण दरात प्रवाशांना रेल्वेचा प्रवास करता येणार आहे. दरम्यान, सोमवारपासून भुसावळ-ईटारसी व भुसावळ-बडनेरा दरम्यान पॅसेंजरऐवजी आठ डब्यांची मेमू गाडी धावणार असल्याने रेल्वे प्रवासी सुखावले आहे. रेल्वे मंत्रालयाने भुसावळ-खंडवा, बडनेरा-नरखेड, नागपूर -आमला, आमला-इटारसी, अमरावती -बडनेरा आणि आमला-छिंदवाडा दरम्यान पुढील सुचनेपर्यंत दैनिक अनारक्षित रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व अनारक्षित मेमू 8 डब्ब्यांसह धावणार आहेत.

भुसावळ-इटारसी मेमू धावणार
गेल्या पावणे दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या पॅसेंजर गाड्यादेखील आता सुरू होत आहेत. त्यात भुसावळ विभागात पॅसेंजरऐवजी मेमू गाडी धावणार आहे. पहिल्या टप्प्यात सोमवारपासून भुसावळ-इटारसी आणि भुसावळ-बडनेरा या मार्गावर प्रथमच दोन विशेष मेमू गाड्या धावतील. त्यात 01183 भुसावळ-इटारसी मेमू सोमवारी रात्री 8.40 वाजता भुसावळहून सुटल्यानंतर सकाळी 6.05 वाजता इटारसी येथे पोहोचेल. यानंतर सायंकाळी 7.30 वाजता इटारसीहून सुटल्यानंतर पहाटे 4.25 वाजता भुसावळात पोहोचले.

या स्थानकावर मेमूला थांबे
ईटारसी मेमूला सावदा, निंभोरा, रावेर, वाघोडा, बर्‍हाणपूर, नेपानगर, सागफाटा, डोंगरगाव, बारगाव गुजर, खंडवा, माथेळा, तळवड्या, सुरगाव बंजारी, चरखेरा खुर्द, चनेर, बारूड, डागर खेडी, खिरकीया, भिरिंगी, मासनगांव, पलसनेर, हरदा, चरखेरा, तिमरनी, पगडल, भैरोनपूर, बानापुरा, धरमकुंडी आणि दुलारीया स्थानकावर मेमूला थांबा देण्यात आला आहे.

भुसावळ-बडनेरादरम्यान धावणार मेमू
मेमू क्रमांक 01365 भुसावळ-बडनेरा मेमू भुसावळहून सोमवारपासून सकाळी 6.30 वाजता सुटून बडनेरा येथे याच दिवशी सकाळी 11.35 वाजता पोहोचेल व त्यानंतर मेमू क्रमांक 01366 बडनेरा येथून दुपारी 1.30 वाजता सुटल्यानंतर सायंकाळी 6.55 वाजता भुसावळात पोहोचणार आहे.

या स्थानकावर मेमूला थांबे
बडनेरा मेमूला वरणगाव, आचेगाव, बोदवड, कोल्हाडी, खामखेड, मलकापूर, वडोदा, बिस्वा ब्रिज, खुमगाव बुर्ती, नांदुरा, जलंब, शेगाव, श्रीक्षेत्र नागझरी, पारस, गायगाव, अकोला, येउलखेड, बोरगाव, काटेपूर्णा, मुर्तीजापूर, माना, कुरम आणि टाकळी (फक्त 01366 साठी) आदी स्थानकावर मेमूला थांबा देण्यात आला आहे.

या नियमांचे करावे लागणार पालन
मेमू गाडीने प्रवास करणार्‍या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत तसेच प्रवासाच्या किमान 72 तास आधी लसीचा दुसरा डोस घेतला असला तरीही प्रवासाला परवानगी मिळणार आहे. प्रत्येक प्रवाशाला लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागेल. टीसींकडून त्यांची तपासणी होईल. तोंडाला मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक राहील. सॅनिटायझरचा वापर करावा लागेल. अन्यथा या गाडीतून प्रवास करता येणार नाही.

सर्वसामान्य भाडे आकारले जाणार
रेल्वे बोर्डाच्या नोटीफिकेशननुसार सोमवारपासून प्रवासी गाड्यांचा विशेष दर्जा रद्द होईल त्यामुळे कोरोनापूर्वी असलेले सर्वसामान्य भाडे आकारले जाईल. म्हणजेच विशेष गाडीच्या तिकिटासाठी मोजावी लागणारी प्रवाशांची 10 ते 33 टक्के जादा रक्कम वाचणार आहे.