महिंदळेतील शेतकर्‍याची आत्महत्या

सततच्या नापिकीला कंटाळून गळफास उचलले टोकाचे पाऊल

महिंदळे, ता.भडगाव : गावातील शेतकरी तुकाराम रतन कोळी यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. शेतात केलेला खर्चही न निघाल्याने शेतकर्‍याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. दरम्यान, घटना उघडकीस आल्यानंतर शेतकर्‍याला तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या कारणास्तव उचलले टोकाचे पाऊल
तुकाराम कोळी यांना तीन मुली व दोन मुले आहेत. मुलीच्या लग्नासाठी व शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. शेतीतून उत्पन्न निघेल, असा अंदाज त्यांनी घेतला मात्र अंदाज फोल ठरून उत्पन्न हातात न आल्याने शेतकरी नैराश्यात गेले होते. सतत नापिकी होत असल्यामुळे व कर्ज काही कमी होत नसल्यामुळे ते गेल्या दोन महिन्यापासून विवंचनेत फिरत होते. यावर्षीही अती पावसामुळे उत्पन्न शून्य झाले त्यामुळे ते अधिकच खचले व त्यांनी शेवटचे पाऊल उचलत पत्नी व मुलांना शेतात पाठवले व घरात कुणीही नसताना छताच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. मयत शेतकर्‍याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परीवार आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास गीते करत आहेत. बुधवारी दुपारी 12 वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.