शिंदखेडा – केंद्र शासनाने व्यापा-यांच्या दबावाला बळी पडून कापूस निर्यात बंदी केल्यास शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडेल त्यामुळे शेतक-यांनी शासनाचा हा प्रयत्न हाणून पाडावा व वेळ आल्यास आंदोलनासाठी सज्ज राहावे असे आवाहन जिल्हा बॅंकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी केले आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पन्नात विक्रमी घट आलेली आहे. प्रति एकरी चार ते पाच क्विंटल एवढ्या कमी प्रमाणात कापूस निघाला आहे.जागतिक बाजारपेठेत तेजी असल्याने कापसास मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.त्यामुळे कापूस पिकास नऊ ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. अश्या परिस्थितीत दक्षिण व्यापारी संघटना आणि मोठे वस्त्र उद्योग व्यापारी वर्ग कापसाचे दर वाढल्याने केंद्र सरकारवर दबाव तंत्राचा वापर करीत आहे. कापसावर निर्यातबंदी लागू करा कापसावरील आयात शुल्क माफ करा यासाठी वस्त्र उद्योग कारखानदार केंद्र सरकारवर दबाव टाकत आहेत केंद्र सरकारने व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडून कापूस निर्यात बंदी केल्यास शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडेल म्हणून शेतकरीवर्गाने सतर्क राहणे गरजेचे असून शेतकऱ्यांतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी दिलेला आहे .