नंदुरबार। नगरपरिषदेच्या विद्युत विभागाकडून पथदिव्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील अनेक वसाहतींमध्ये नवीन पथदिवे बसवल्याने परिसर प्रकाशमान झाले आहेत. नवापूर चौफुली ते जिल्हा रुग्णालय पर्यंत पथदिवे बसविण्यात आले आहे. दोन्ही घरकुलांमध्ये विद्युत रोहित्र बसविण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली ते जिल्हा रुग्णालय परिसरात विद्युत व्यवस्था नव्हती. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना विद्युत व्यवस्था नसल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पालिकेच्या मुख्याधिकार्यांना सूचना केल्या. त्यानंतर विद्युत विभागाचा पथकाने काम हाती घेतले. नवापूर चौफुली ते जिल्हा रुग्णालयापर्यंत परिसरातील रस्त्यावर नवीन 25 विद्युत खांबसह दिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची सोय झाली. नंदुरबार शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तसेच नवीन वसाहतीमध्ये शेकडोंवर विद्युत खांब व त्यावर दिव्यांची व्यवस्था केलेली आहे. विद्युत दिव्यांच्या झगमगाटामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची सोय झाली आहे. पालिकेचे विद्युत पथकातील कर्मचारी शहरातील विविध भागात जाऊन देखभाल दुरुस्तीची कामे करीत आहेत.
दिव्यांचा लखलखाट
शहरात 100 पेक्षा जास्त नवीन विद्युत खांबसह व दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात दिव्यांच्या लखलखाटात दिसून येत आहे. नगरपालिकेकडून दिव्यांची सोय झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
घरकुलांमध्ये विद्युत रोहित्र
भोणे फाट्याजवळील घरकुल व जिल्हा रुग्णालय परिसरातील घरकुलांमध्ये पालिकेकडून विद्युत रोहित्र बसविण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी 200 केव्ही क्षमतेचे रोहित्र आहे. त्यामुळे पथदिव्यांची सोय केली आहे.